संगमनेर शहर व परिसरात चोर्यांचे ‘पुन्हा’ सत्र
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील एका मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या खोलीमधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 1 लाख 3 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. तर शहराजवळील सुकेवाडी येथील गोसावी मळ्यातही अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह इतर साहित्य असा एकूण 68 हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या शुक्रवारी (ता.27) उघडकीस आल्या आहेत. यामुळे शहरासह परिसरात पुन्हा चोर्यांचे सत्र सुरू झाले असून, पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अकोले येथील निवृत्ती चिमाजी सेनकर यांच्या मुलाचे लग्न संगमनेरातील एका मंगल कार्यालयात होते. तेथे नवरदेवाला खोली देण्यात आलेली होती. तिथे नवरदेवाच्या बहिणीने 45 हजार 600 रूपयांचे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 25 हजार रुपयांची अर्धा ग्रॅम वजनाची अंगठी, 3 हजारांचा चांदीचा करंडा, 10 हजार रुपयांचे दोन मोबाईल व रोख रक्कम 20 हजार रूपये असा एकूण 1 लाख 3 हजार रूपये किंमतीचा ऐवज पर्समध्ये ठेवून ती पर्स खोलीमधील खुर्चीवर ठेवली होती. दरम्यानच्या काळात मुलाला पाणी पाजत असतानाच संधीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने वरील ऐवज लांबवून पोबारा केला आहे. या प्रकरणी निवृत्ती सेनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 2014/2020 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे. तर दुसर्या घटनेत सुकेवाडी शिवारातील गोसावी मळा येथील अनिता मच्छिंद्र गोसावी यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून रोख रक्कम 60 हजार रुपये, 5 हजार रुपये किंमतीच बॅटरी आणि 3 हजार रुपये किंमतीचा मिक्सर असा मुद्देमाल चोरला आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात 2013/2020 भादंवि कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करत आहे. दरम्यान, दोन्ही घटनांवरुन शहर व परिसरात चोर्यांचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांना योग्य पावले उचलून नियंत्रण मिळवावे लागणार आहे.