कोरोना रुग्णामागे पालिकेस निधी ही निव्वळ अफवा!
कोरोना रुग्णामागे पालिकेस निधी ही निव्वळ अफवा!
कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा खुलासा
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात एक अफवा पासरली आहे की, कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर एका रुग्णामागे नगरपालिकेस दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे, अशी चर्चा शहरासह तालुक्यात जोर धरू लागली आहे. मात्र ही निव्वळ अफवा असून असा कोणताही निधी पालिकेस मिळत नाही असा खुलासा कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केला आहे.
![]()
22 मार्च, 2020 पासून कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना कोपरगाव पालिका, तहसील कार्यालय, शहर व ग्रामीण पोलीस कर्मचारी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय या सर्व प्रशासकीय यंत्रणेमार्फत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये वेळोवेळी सॅनिटायझर फवारणी, घरोघरी आरोग्य तपासणी, बाधित रुग्णांना योग्य उपचार, बाधित रुग्ण आढळून आलेल्या भागास प्रतिबंधित क्षेत्र करणे, नागरिकांना विविध सेवा-सुविधा पुरवणे, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे या सर्व बाबी काळजीपूर्वक राबविण्यात येत आहेत.
![]()
परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये एक अफवा पसरली आहे की, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास त्यामागे पालिकेला प्रत्येक रुग्णामागे दीड लाख रुपये अनुदान मिळत आहे. तरी सर्व नागरिकांना आवर्जून सांगतो की, आमचे पालिका कर्मचारी अहोरात्र कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहेत. त्यापैकी जे कर्मचारी कोविड केअर सेंटरला कार्यरत आहेत ते मागील दीड महिन्यांपासून शहरात त्यांचे घर असून देखील त्यांच्या घरच्यांना भेटले नाहीत. ते अहोरात्र रुग्णसेवा करत असताना त्यांच्यामुळे समाजातील लहान, वयोवृद्ध नागरिकांना बाधा होऊ नये या हेतूने कोविड सेंटरला सेवा दिल्यानंतर प्रशासनाने व्यवस्था केलेल्या हॉटेलमध्ये राहत आहे. मार्च 2020 पासून कोरोनाबाधित रुग्णामागे कोणताही निधी पालिकेला मिळालेला नाही. तसेच भविष्यात देखील निधी मिळेल याबाबत शासन स्तरावर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की, समाज माध्यमातून पसरणार्या अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.

प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. या त्रिसूत्रीचा आपल्या दररोजच्या जीवनात अवलंब करत जीवनावश्यक गोष्टींमध्ये यांचा समावेश करत प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच राज्य शासनाने व कोपरगाव प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत वाढती कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सरोदे यांनी केले आहे.
