गणरायाच्या आगमनासाठी भक्तांसह मूर्तीकार सज्ज यंदा बाप्पाच्या मूर्ती वीस टक्के महागण्याची शक्यता
नायक वृत्तसेवा, राजूर
लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आतुरतेने ज्याची सर्वजण वाट पाहत असतात त्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशातच राजूर येथील मूर्तीकार विनायक भालेराव गणेशोत्सवाकरिता लागणार्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत असून अधिक मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत. मोठ्या मूर्तींना मागणी वाढली असून, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने यंदा बाप्पाच्या मूर्ती दहा ते वीस टक्के महागण्याची शक्यता आहे.
गणेश मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती व नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तीची देखील रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. राजूरचे प्रसिद्ध मूर्तीकार भालेराव बंधू यांनी सांगितले, की निर्बंध हटल्याने मोठ्या मूर्तींना मागणी वाढली आहे. त्यातच कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने यंदा किमती दहा ते वीस टक्के वाढण्याची शक्यता अपेक्षित आहे. कारागिरांच्या मानधनात वाढ तसेच रंग, काथ्या, दाग-दागिन्यांची सजावट, प्लॅस्टर ऑफ पॅरिस या साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने थोडी वाढ निश्चित होणारच आहे.
मूर्तीची साफसफाई करण्यासाठी घरातील महिला मदत करतात. तसेच आखणी व रेखणी करण्यासाठी वर्षभर काम करत असल्याचेही भालेराव बंधू यांनी आवर्जुन सांगितले आहे. दरम्यान, बाप्पांच्या आगमनासाठी महिनाभर आधीपासूनच भक्त तयारीला लागतात. मंडप सजावट, मूर्ती, विद्युत रोषणाई, कार्यक्रमांचे आयोजन अशी सगळ्यांची जुळवाजुळव करण्यात सगळेच सध्या व्यस्त असल्याचेही पाहायला मिळत आहे.