शेंडीच्या व्यापार्यांकडून व्यापार्याला आर्थिक मदतीचा हात समाजासमोर ठेवला नवा आदर्श; व्यापार्यांचे परिसरातून कौतुक
नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथे व्यापारी बांधवांनी एकत्र येत एका वयस्कर आणि गरीब व्यापार्याला मदतीचा हात बहाल करत पुन्हा व्यापारासाठी उभे करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. व्याबद्दल व्यापार्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
शेंडी (भंडारदरा) या गावामध्ये गोंविद रावळ या वयस्कर व्यक्तीचे भर चौकात दहा बाय दहाच्या जागेत छोटेसे स्टेशनरीचे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी चोरी करत सर्व वस्तू चोरुन नेल्या. यामुळे रावळ यांची उपजीविकाच यावर अवलंबून असल्याने झालेल्या चोरीबद्दल शेंडीतील व्यापार्यांसह सर्वांनाच वाईट वाटले. त्यात गोंविंद रावळ (काका) यांचा स्वभाव अतिशय शांत असल्याने शेंडीचे सरपंच व हॉटेल प्रवराचे संचालक दिलीप भांगरे यांनी सर्व व्यापार्यांना एकत्र करत यावर काही उपाययोजना करता येईल यासंदर्भात चर्चा केली. त्यावर सर्व व्यापार्यांनी यथाशक्तीप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्काळ निधी उभा करण्यात आला. बघता बघता तीन तासांत 23 हजार 111 रुपये जमा झाले. ते गोविंद रावळ यांना सरपंच दिलीप भांगरे व व्यापार्यांच्या हस्ते देण्यात आले.
यापूर्वीही अशाच प्रकारचा प्रसंग 1998 साली स्वर्गीय सुरेश घाटकर यांच्यावर आला होता. तर मागील वर्षी भाऊसाहेब अवसरकर यांच्यावरही अशाच पद्धतीची वेळ आली होती. त्यावेळी दोन्ही व्यक्तींची दुकाने अचानक आग लागल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. तेव्हाही व्यापार्यांनी एकत्र येत निधी उभा करत वरील व्यक्तींना मदतीचा हात बहाल केला होता. 1998 सालापासून सुरु झालेली परंपरा आजही शेंडीतील व्यापार्यांनी टिकवून ठेवली आहे. मदत निधी जमा करण्यासाठी शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, वैभव मेहता, अनिल अवसरकर, स्वप्नील शहा, रामेश्वर अवसरकर, पांडुरंग अवसरकर, मारुती मोरे, नितीन शहा, कैलास शहा, हेमंत अवसरकर, जवाहर शहा यांच्यासह आदी व्यापार्यांनी पुढाकार घेतला. तर या झालेल्या चोरीची तक्रार राजूर पोलिसांत दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस कर्मचारी दिलीप डगळे, अशोक काळे हे करीत आहेत.
शेंडी येथे गोविंद रावळ यांच्या दुकानात झालेला चोरीचा प्रकार निंदनीय असून राजूर पोलिसांकडून लवकरच चोरीचा तपास लावण्यास येऊन आरोपींना अटक करण्यात येईल.
– नरेंद्र साबळे (सहाय्यक पोलीस निरीक्षक-राजूर)
शेंडी येथील व्यापार्यांनी एकत्र येत गोविंद काकांना दिलेला मदतीचा हात निश्चितच कौतुकास्पद आहे. 1998 पासून सुरु केलेली परंपरा आजही टिकवून ठेवल्याचा आनंद आहे.
– दिलीप भांगरे (सरपंच-शेंडी)