जातीवाचक संदेश टाकल्याने देवळाली प्रवरात कडकडीत बंद राहुरी पोलिसांत व्हाट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनसह अन्य दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा


नायक वृत्तसेवा, राहुरी
समाज माध्यमावर जातीवाचक संदेश टाकल्याप्रकरणी देवळाली प्रवरा (ता.राहुरी) येथील व्हाट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनसह अन्य दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जातीयवाद्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी देवळाली प्रवरा शहरात आरपीआयच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा परिसरात समाज माध्यमावर असलेल्या सकल हिंदू समाज राहुरी फॅक्टरी-देवळाली प्रवरा या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर जातीवाचक संदेश टाकून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे राहुरी पोलिसांत सागर संसारे यांच्या फिर्यादीवरून डॉ. रवींद्र सुदाम भांड, अनिल पटारे, दत्तात्रय गागरे (ग्रुप अ‍ॅडमिन) या तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा शहरात आरपीआयच्यावतीने निषेध रॅली काढून देवळाली प्रवरा बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील व्यापारी व दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. दुपारपर्यंत शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प होते.

गुरुवारी (ता.२६) सकाळी देवळाली प्रवरा बाजारतळ येथे घटनेचा निषेध करून समाज माध्यमांवर जातीयवादी संदेश टाकणार्‍या आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, रफीक शेख, कुमार भिंगारे, एकलव्य संघटनेचे गीताराम बर्डे, संतोष सरोदे, शोएब तांबोळी यांनी निषेधपर मनोगते व्यक्त केली. यावेळी राजू थोरात, माऊली भागवत, संजय संसारे, जनता ग्रुपचे पप्पू बर्डे, सोमनाथ भागवत, मनसेचे अनिल डोळस, विजय सरोदे, शंकर धोत्रे, लालू पंडित, अर्षद शेख आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 26 Today: 1 Total: 118201

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *