बडव्यांनीच घडवला पांडूरंगाचा पराभव! सत्तेचा प्रदीर्घ वनवासही कारणीभूत; पदाधिकारी बनले वतनदार..


श्याम तिवारी, संगमनेर
प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होण्याच्या पूर्वरात्री आकाशात उडणारे धडाऽम धूमऽ फटाके आणि निकालापूर्वीच महामार्गाच्या मध्यातील खांबळ्यांना लटकावलेले भावी मुख्यमंत्र्यांचे फलक यातून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण यंत्रणाच किती गाफील होती याचा प्रत्यक्ष अनुभव येत होता. वेगवेगळ्या संस्थांनी केलेली सर्व्हेक्षणं, पत्रकारांकडून प्रसिद्ध झालेले आढावे, थोरात साहेबांवर प्रेम करणार्‍या ‘काहींनी’ अडथळे ओलांडून सांगितलेली वस्तुस्थिती याकडे दुर्लक्ष केले गेले. साहेब आता मुख्यमंत्री झालेच, अशा अविर्भावात त्यांच्या भोवतीच्या ठराविक बडव्यांनी त्यांच्यासह संपूर्ण यंत्रणेलाच अंधारात ठेवले. झपाट्याने बदणारी राजकीय स्थिती सांगण्याचा कोणी प्रयत्न केला की याच बडाव्यांकडून त्याला वेडं ठरवलं जावू लागलं. जिल्हा परिषदेचे गट सांभाळणारे पदाधिकारी तर स्वतःला वतनदारच समजू लागल्याने त्यांची वागणूक वतनदारासारखी झाली. सत्ता सामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे याचाच विसर पडल्याने केवळ साहेबांची प्रतिमा वापरुन अमाप पैसा जमवण्यातच प्रत्येकजण व्यस्त राहीला. साहेबांना भेटून बोलणंही दूरापास्त झाल्याने लांब गेलेला मतदार शेवटी महायुतीकडे झुकला आणि गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातील सुसंस्कृत चेहरा म्हणून लोकमान्य झालेल्या बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या राजकीय महामेरुला पराभव पत्करावा लागला.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर महायुतीकडून लढलेल्या अमोल खताळ यांच्याकडून पराभव झाला. वरकरणी त्यांच्या पराभवाला लाडकी बहिण, बटेंगे तो कटेंगे यासारखी ढोबळ कारणे असली तरीही 1990 चे श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि मोदी लाटेतही साजेसा विजय मिळवणार्‍या बाळासाहेब थोरात यांचा चार दशकांचा राजकीय किल्ला इतक्या सहजासहजी पडणारा नव्हताच. मात्र ही किमया साधली त्यांच्या भोवती सतत कोंडाळं केलेल्या बडव्यांनी. बाळासाहेब थोरात यांचा राज्यात दबदबा वाढल्यानंतर त्यांच्या गैरहजेरीने निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेवून या बडव्यांनी अख्खी यंत्रणाच पोखरली. नेहमी माणसांमध्ये राहणार्‍या साहेबांना याच कोंडाळ्याने दूर नेले.


2014 साली राज्यात मोदीलाटेसह भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाले. 2019 च्या निवडणुकीत एकत्रित निवडणुका झाल्यानंतर महायुती भंगली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आघाडीने सरकार स्थापन केले. अडीच वर्षाच्या सरकारमध्ये संगमनेरला महसूलमंत्रीपद मिळाले. मात्र या बडव्यांनी अडीच वर्षाच्या काळात सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना ताटकळत ठेवून स्वतःच्याच तिजोर्‍या भरण्याचे काम केले. माणसं हातात कागदं घेवून हेलपाटे मारीत राहीली, मात्र ना साहेबांची भेट.. ना कामातून दिलासा. त्यामुळे माणसं दुखावली जावू लागली. अडीच वर्षांची सत्ता गेली आणि पुन्हा वनवास पदरी आला. अशावेळी काम घेवून दारात आलेल्याला मदत करण्याऐवजी केवळ कागदपत्रांच्या पूर्ततेतच त्याचा दम काढला जावू लागला. त्यामुळे त्यातील काहींनी लोणीच्या जनता दरबाराचा अनुभव घेत आपली निष्ठा सोडण्यास सुरुवात केली.


दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या गटांची जबाबदारी दिलेले गावपुढारी मिळालेला गट जणू आपल्याला आंदणच आहे असे समजून वावरु लागला. चारचौघात गावातील गोरगरीबांची मस्करी, थट्टेने बोलण्यासह राग काढण्याची पद्धत, सतत शिवराळ भाषा अशा बेमालुम मस्तीने सामान्य स्वाभामानी माणूस दुखावला गेला. त्यातच वारंवार विनवण्या करुनही रोहित्रासारखी जिव्हाळ्याची कामेही महिनोन् महिने तशीच राहिल्याने बडव्यांच्या वागण्यातून पांडूरंगापासूनच माणूस दूर जावू लागला. साहेबांनाही राज्यात एकामागून एक संधी मिळत गेल्याने त्याचे सोनं करण्यामागे त्यांचे मुंबई, दिल्ली दौरे वाढले. या काळात संगमनेरातील त्यांच्या शिलेदारांनी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी आपल्या साधनसंपत्त्या वाढवण्याकडेच अधिक लक्ष दिले. साहेबांच्या प्रतिमेचा सर्रास वापर करुन गोरगरीबांच्या जमिनी गिळण्यापर्यंत काहींची मजल गेली.


लोकप्रतिनिधी हा लोकांनी निवडलेला असतो, त्यासाठी दर पाचवर्षांनी निवडणुका होतात याचा विसर पडलेल्या बडव्यांनी पांडूरंगापासून लोकांना दूर नेण्यासह त्यांना प्रजेत सर्व व्यवस्थित असल्याचे खोटे चित्रही दाखवण्याचे काम केले. डॉ.जयश्री थोरात यांच्या युवासंवाद यात्रेच्या प्रतिसादातून बर्‍याच गोष्टींचा उलगडा झाला होता. मात्र याच बडव्यांनी त्याची साधी जाणीवही त्यांना होवू दिली नाही. धांदरफळमधील प्रकारानंतर उपोषणातून गांधीगिरी करण्याचा सर्वोत्तम उपाय असतानाही हिंसक प्रत्युत्तर देण्याची योजना आखली गेली. त्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याऐवजी, नकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतरही होत असलेली पडझड थांबवता येणं शक्य होतं. मात्र माणसांपासूनच दुरावलेले साहेब आणि हवेत असलेले बडवे त्याचा मागमूस घेवू शकले नाहीत.


तळेगावला माजीमंत्री, तीन खासदार यांच्या उपस्थितीत सभा घेवूनही कोणताच उपयोग झाला नाही. याची जाणीव तेव्हाही काहींना झाली, त्यांनी साहेबांच्या कानावरही घातली. मात्र तेथील बडव्यांनी सगळं आलबेल आहे, थोडंफार आहे, ते आम्ही सांभाळून घेवू असे सांगत त्यावर पडदा टाकला. मात्र हिच खद्खद् प्रत्यक्ष मतदानापर्यंत तशीच राहिली, वाढली आणि त्याचा परिणाम अपवाद वगळता ग्रामीणभागातील जवळपास सगळ्याच फेर्‍यांमध्ये माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना पिछाडीवर रहावे लागले. थोडाफार दिलासा देणार्‍या गावांनी अधुनमधून त्यांना सावरण्याचा प्रयत्नही केला. मात्र बडव्यांनी निर्माण केलेल्या रोषापुढे तो खूप किरकोळ ठरला. संगमनेर शहरानेही त्यांना 4 हजार 279 अधिक मतं देवून तारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.


प्रत्यक्ष मतदानापूर्वी, मतदानाच्या दिनी आणि निकालाच्या दिवसापूर्वीच्या तीन दिवसांत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते. एक्झिट पोलीमधूनही तसेच संकेत मिळाले होते. मात्र असे असतानाही निकालाच्या पूर्वरात्री साहेबांना कोंडाळे करुन त्यांचा पराभव लिहिणार्‍या याच बडव्यांनी ढोलताशा आणि फाटाक्यांची आतषबाजी करीत आपला विजय झाल्याचा जल्लोशही साजरा केला. मध्यरात्रीपर्यंत थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानसमोर हा प्रकार सुरु होता. अनेकांना हे सगळं बघून आश्‍चर्यही वाटतं होतं, पण बोलणार कोण? असा प्रश्‍न होता. एकीकडे हे सगळे सुरु असताना दुसरीकडे नाशिक महामार्गावरील विद्युत खांबांवर ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असे फ्लेक्सही लावले जात होते.


संगमनेर तालुक्यावर चाळीस वर्ष राज्य करणार्‍या, सलग आठवेळा चढत्या मताधिक्क्याने विजयी झालेल्या, आमदार ते भावी मुख्यमंत्री अशी उत्तुंग भरारी घेतलेल्या बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या निवडणूक यंत्रणेला यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी विचार बदलल्याचे समजू नये यावरुनच या बडव्यांची करामत लक्षात येते. थोरातांनीही त्यांच्यावर टाकलेला अतिविश्‍वास त्यांच्या पराभवाला कारणीभूत असून या सर्वांची कारणमीमांसा शोधताना संघटनात्मक पातळीपासून स्वतःभोवतीच्या माणसांपर्यंत त्यांना बदल करावे लागतील. यासर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देवून येणार्‍या कालावधीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांचे कार्यकर्ते पुन्हा उभारी घेतील आणि यश मिळवतील असा विश्‍वास त्यांच्या चाहत्यांना आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चारदशकांच्या राजकीय कारकीर्दीला असा ब्रेक लागावा यावर आजही काहींना विश्‍वास बसत नाही. सलग चार दशकं संपूर्ण तालुक्यावर अधिराज्य गाजवणार्‍या आणि आजवर ग्रामीणभागात कोणत्याही विरोधकाला ठामपणे उभे राहण्यापासून रोखणार्‍या थोरातांना यावेळी मात्र डॉ.सुजय विखे-पाटलांच्या सभांनी जोरदार चपराक दिली. तालुक्यातील एकूण 288 मतदार केंद्रातील (तितकेच ईव्हीएम) अवघ्या 68 ग्रामीण आणि 22 शहरी अशा एकूण 90 मतदार केंद्रांशिवाय उर्वरीत सर्व केंद्रांवर शिवसेनेच्या अमोल खताळ यांना आघाडी मिळाली. हा सर्व घटनाक्रम बडव्यांनी निर्माण केलेले आभाशी चित्र भेदणारे ठरल्याने समोर आलेला निकाल बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणार्‍यांसाठी धक्कादायक होता, मात्र त्याची पटकथा फार पूर्वीपासूनच लिहिली गेली होती.

Visits: 72 Today: 2 Total: 163240

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *