रेल्वेमार्गावरुन ‘संभ्रम’ निर्माण झाल्याचे नामदार विखेंचे पत्र! लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीची मागणी; विश्‍वासात घेवूनच निर्णयाचे आवाहन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक व्हाया संगमनेर सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावरुन उत्तरेतील राजकारण चांगलेच तापले असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार सत्यजीत तांबे यांनी नाव न घेता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच रेल्वेमार्ग पळवल्याचा रोख कायम ठेवल्याने जिल्ह्यातील राजकारणात संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी नामदार विखे-पाटील यांनीच पुढाकार घेतला असून रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार करताना त्यांनी प्रस्तावित रेल्वेमार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. संसदेतील रेल्वेमंत्र्यांच्या उत्तराने अहिल्यानगर जिल्ह्यात संभ्रम झाला असून कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्‍वासात न घेता मूळ संरचनेत बदल झाल्याने त्याचा रोष सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात प्रस्तावित रेल्वेमार्गात कोणताही बदल करण्याची घोषणा करण्यापूर्वी पुणे-नाशिक व्हाया संगमनेर मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी असे आवाहनही नामदार विखे यांनी पत्राद्वारे केले आहे. त्यामुळे जवळजवळ बांसनात गेलेल्या या रेल्वेमार्गाने पुन्हा एकदा धुगधुगी वाढवली आहे.


याबाबत नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहारा बाबतची माहिती देण्यात आली आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वमार्गासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय करु नयेत, प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या बदलाबाबत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


संसंदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात गेल्या बुधवारी (ता.3) पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात प्रस्तावित मार्गात बदल करुन शिर्डीमार्गे नवा मार्ग प्रस्तावित केल्याची बाब समोर आल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यानुसार नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या भागातून रेल्वेमार्ग निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले होते. मात्र त्या उपरांतही रेल्वेमार्गात अचानक झालेला बदल आश्‍चर्यकारक असल्याचा उल्लेखही पत्रात असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.


यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रेल्वेप्रकल्पाच्या आराखड्यातील बदलांबाबत जिल्ह्यातील कोणत्याही लोकसभा अथवा विधानसभा सदस्यांशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. प्रकल्प मार्गात बदल करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेणे अतिशय आवश्यक आहे. परंतु, तशी कोणतीही चर्चा न झाल्याने लोकप्रतिनिधींसह जनतेमध्ये रेल्वेमार्गाबाबत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणाचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करण्याची वेळ आली असल्याने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंतीही या पत्राद्वारे रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे.


प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत पहिल्यापासून असलेली मागणी विचारात घेण्यासाठी आपण तातडीने सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी. तसे, लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतल्याशिवाय नाशिक-पुणे रेल्वेबाबत कोणताही निर्णय घेवू नये अशी विनंतीही राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात केल्याने जवळजवळ बांसनात गुंडाळल्या गेलेल्या या रेल्वेप्रकल्पाची धुगधुगी पुन्हा वाढली आहे.


रेल्वे असतानाही पळवापळवी कशाला? : माजीमंत्री थोरात
पुण्याहून नाशिकला जाण्याचा नैसर्गिक मार्ग कोणता असा प्रश्‍न एखाद्या लहान मुलालाही विचारला तरीही तो व्हाया संगमनेर असाच नकाशा काढून दाखवेल. खर्‍या अर्थाने पुणे-मुंबई आणि नाशिक असा सुवर्ण त्रिकोण साधणार्‍या या रेल्वेमार्गामुळे केवळ संगमनेरच नाहीतर लोणीचाही विकास होणार होता असा चिमटा घेत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेल्वेप्रकल्पावरुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर आज पुन्हा निशाणा साधला.


आज ज्या प्रमाणे विमानतळ महत्वाचे आहे, तसे निळवंडे धरणही महत्वाचे असल्याचा टोला लगावताना त्यांनी पुढील पिढ्यांचे कल्याण होईल, त्यांच्या जीवनात संपन्नता येईल यासाठी पुणे-नाशिक रेल्वेमार्ग महत्वाचा असल्याचे सांगताना तालुक्यातील दुष्काळीभागातील कृषीमाल महानगरांमध्ये पाठवता यावा यासाठी सोनेवाडीजवळ मालधक्का उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचा दाखलाही दिला. उत्तरेतील श्रीरामपूर, शिर्डी व कोपरगावला आधीपासूनच रेल्वेमार्ग आहे, मग संगमनेरहून जाणारी रेल्वे पळवण्याचे कारण काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


नैसर्गिक पद्धतीने व्हाया संगमनेर, सिन्नर जाणार्‍या या रेल्वेमार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादनही झाले आहे आणि त्याचा मोबदलाही शेतकर्‍यांना मिळाला आहे. असे असतानाही रेल्वेमार्ग फिरवण्याचा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे माजीमंत्री थोरात म्हणाले. अकोल्यातील नागरिकांनी हा रेल्वेमार्ग त्यांच्याकडून नेण्यासाठी आंदोलन छेडल्याच्या विषयावर त्यांनी अकोलेकरांच्या मागणीला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. रेल्वमंत्र्यांनी कोणतेही राजकारण न आणता नैसर्गिक न्यायाने पुढील दहा-वीस नव्हेतर शंभर वर्षांचा विचार करुन नागरिकांना सुलभता आणि संपन्नता मिळेल असा निर्णय घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

Visits: 134 Today: 2 Total: 1412614

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *