‘अखेर’ जवळ्याच्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश! आमदार अमोल खताळ यांची मध्यरात्री धावपळ; चार वर्षांच्या चिमुकल्या सिद्धेशला न्याय मिळणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही वर्षात संगमनेर-अकोले तालुक्याच्या ग्रामीणभागात बिबट्यांची दहशत वाढली असून भरदिवसा बिबट्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले वाढलेले असतानाच शनिवारी जवळे कडलगमधील एका चिमुरड्यावर झेप घेत बिबट्याने त्याचा बळी घेतला होता. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त होत असताना प्रचंड संख्या वाढलेल्या बिबट्यांना ठार मारण्याची मागणीही पुढे आली होती. या घटनेने संपूर्ण तालुका हादरलेला असतानाच संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सदरच्या घटनेनंतर वनमंत्र्यांसह प्रधान वनसंरक्षकांशी सातत्याने संपर्क साधून आज पहाटेच्या सुमारास जवळ्याच्या ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढले आहेत. नागपूर विभागाचे प्रधान वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी यांनी मध्यरात्री याबाबतचे आदेश जारी केले असून चिमुरड्या सिद्धेशला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

शनिवारी (ता.13) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील जवळे कडलग येथील सुरज कडलग यांच्या वस्तीवर सदरची वेदनादायक घटना घडली होती. मयत चिमुरड्याचे वडील सुरज कडलग गोठ्यातील जनावरांना चारा घालण्यात व्यस्त असताना बाजूच्या गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने संधी साधत एका झेपेतच सिद्धेशचा गळ्याचा घोट घेतला. या घटनेनंतर त्याच्या वडिलांसह कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली, मात्र त्याच्या हल्ल्यात सिद्धेशचा बळी गेला होता.

या घटनेनंतर जवळे कडलगसह संपूर्ण तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण होवून बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासह नरभक्षक झालेल्या बिबट्याला ठार मारण्याची मागणी होत होती, मयत सिद्धेशच्या कुटुंबियांनीही तशीच भूमिका घेत बिबट्याला ठार केल्याशिवाय मृतावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतल्याने वातावरण गंभीर झाले होते. या घटनेची माहिती मिळताच सध्या नागपूरमध्ये असलेल्या आमदार अमोल खताळ यांनी मयत सिद्धेशचे वडील सुरज कडलगयांच्याशी संपर्क साधून त्यांचे सांत्वनही केले आणि सदरील बिबट्याला जेरबंद अथवा ठार मारण्यासाठी आवश्यक त्यासर्व गोष्टी करण्याचे आश्वासनही दिले.

या घटनेने व्यथीत झालेल्या आमदार खताळ यांनी पालकमंत्री, वनमंत्री, उपमुख्यमंत्री अशा सगळ्यांनाच या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहून भयभीत संगमनेरकरांना दिलरसा देण्याचे साकडे घातले. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांची ही धावपळ सुरु होती, अखेर गेल्याकाही कालावधीतील संगमनेर तालुक्यात घडलेल्या काही घटना पाहता वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रधान वनसंरक्षक एम.श्रीनिवासन रेड्डी यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी वरील संदर्भाने आज (ता.14) पहाटे नाशिकच्या प्रादेशिक मुख्य संरक्षकांना आदेश बजावले असून जवळे कडलग येथील बिबट्यास गुंगी देवून, पिंजरा लावून पकडण्याच्या पर्यायाशिवाय त्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. सदरचे आदेश 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत कायम ठेवले जाणार आहेत.

राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवरुन चालू हिवाळी अधिवेशनातही मोठा गदारोळ झाला होता. त्यावरुन वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांसाठी जंगलात एक कोटी रुपयांच्या शेळ्या सोडण्याचा पर्यारू दिला गेल्यानंतर त्यावरुनही राजकारण तापले होते. बिबट्यांची नसबंदी करुन त्यांची संख्या मर्यादीत करण्यावरही सभागृहात एकमत होत असतानाच संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत घराच्या ओसरीत खेळणार्या चिमुकल्या सिद्धेश कडलगचा बळी गेल्याने वातावरण गंभीर झाले होते. आमदार अमोल खताळ यांनी लोकभावनांचा आदर करीत कडाक्याच्या थंडीतही मध्यरात्रीनंतरही विविध मंत्री व वनविभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांशी सातत्याने संपर्क साधून अखेर जवळ्यातील ‘त्या’ नरभक्षकाला गोळ्या घालण्याचे आदेश मिळवल्याने मृत सिद्धेशला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

