डॉ.अतुल आरोटेंवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा! पत्नीला मारहाण केल्याची तक्रार; वडीलांच्या सहभागाचाही आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या काळात मृत रुग्णाच्या बिलासाठी दीर्घकाळ त्याचा मृतदेह खोळंबून ठेवण्याच्या कारणावरुन त्यावेळी चर्चेत आलेल्या डॉ.अतुल आरोटे यांच्यावर आता कौटुंबिक हिंसाचाराचाही गुन्हा दाखल झाला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या मात्र वादाच्या कारणातून सध्या मुलांसह विभक्त राहणार्या त्यांच्या पत्नीने पती व सासर्याने घरी येवून शिवीगाळ, दमबाजी व जीवे मारण्याची धमकी देत आपल्या मुलाला सोबत नेल्याची तक्रार दाखल केली असून त्यावरुन शहर पोलिसांनी शहरातील नामवंत वैद्यकिय व्यावसायिक डॉ.अतुल आरोटे यांच्यासह सेवानिवृत्त शासकीय अधिकारी असलेले त्यांचे वडील रामनाथ आरोटे यांच्या विरोधात इच्छापूर्वक दुखापत करण्यासह फौजदारी धाकदपडशा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संगमनेरच्या वैद्यकिय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सोमवारी (ता.8) दुपारी दीडच्या सुमारास सुकेवाडी येथील तक्रारदार डॉ.स्वप्नाली अतुल आरोटे यांच्या माहेरी घडला. तक्रारीनुसार डॉ.स्वप्नाली यांचे पती डॉ.अतुल यांच्याशी कौटुंबिक वाद असल्या कारणांमुळे त्या गेल्याकाही काळापासून आपल्या मुलांसह आई-वडीलांच्या घरी राहतात. या दरम्यानच सोमवारी दुपारी सदरचा प्रकार घडला.

दुपारी अचानक सासरे रामनाथ दशरथ आरोटे व पती डॉ.अतुल रामनाथ आरोटे घरात आले व त्यांनी काहीएक कारण नसताना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली असे दाखल तक्रारीत म्हंटले आहे. यावेळी त्या दोघांनीही तक्रारदाराच्या ताब्यातून त्यांच्या मुलाला घेवून जाताना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकाराने घाबरलेल्या डॉ.स्वप्नाली यांनी घटनेनंतर तात्काळ शहर पोलीस जावून घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी शहरातील नामवंत वैद्यकिय व्यावसायिक डॉ.अतुल आरोटे व पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त असलेले त्यांचे वडील रामनाथ दशरथ आरोटे या दोघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 115 (2), 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

कोविड संक्रमणाच्या काळात एकीकडे ऑक्सिजनची सुविधा असलेली खाट मिळवण्यासाठी बाधित रुग्णांचा संघर्ष सुरु होता, काहींना वेळेवर खाट उपलब्ध न झाल्याने अथवा खाट उपलब्ध होवूनही अधिक प्रमाणात संक्रमण झाल्याने आपले जीव गमवावे लागत होते. बाधितांच्या गर्दीने तालुक्यातील बहुतेक सर्वच रुग्णालये अक्षरशः ओसंडलेली होती, लोकांच्या मनात मृत्यूचे भय नांदत होते. तर, दुसरीकडे या संधीचा फायदा घेवून वैद्यकिय क्षेत्रात असलेल्या काहींकडून चक्क मढ्याच्या टाळूवरचेही ओरबाडले जात होते.

अशा भयानक काळात वडीलांपाठोपाठ जीव गमावलेल्या त्यांच्या तरणाबांड मुलाच्या उपचारांचे पैसे भरण्यासाठीही कोणी नसल्याने त्या दुर्दैवी कुटुंबाच्या घराजवळ राहणार्या काहींनी वर्गणी करुन काही रक्कम जमवली व डॉ.आरोटे यांची भेट घेवून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देत मयत तरुणाच्या कुटुंबात कोविडने बाधित असलेली त्याची आई आणि पत्नी दोघीच असल्याचे वास्तव सांगितले. संबंधिताचा अंत्यविधीही गल्लीतील लोकांनाच करावा लागणार असल्याचेही त्यांना सांगितले गेले. मात्र कोविड म्हणजे पैसा कमावण्याची नामी संधी मिळाल्याने संबंधित रुग्णालयाने पूर्ण रक्कम अदा केल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला.

त्याचा परिणाम दुपारी साडेबाराच्या सुमारास जीव गमावलेल्या ‘त्या’ दुर्दैवी तरुणाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताटकळत रुग्णालयातच पडून राहीला. याबाबत रात्री साडेअकराच्या सुमारास दैनिक नायकला ही धक्कादायक माहिती समजल्यानंतर तत्कालीन तहसिलदार अमोल निकम यांच्या निदर्शनास ती आणून देत तब्बल बारातासांनी कोविडने मृत्यू पावलेल्या त्या तरुणाचा मृतदेह सोडण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे त्यावेळी संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने चक्क तहसिलदारांनाही बिलाची रक्कम कोण देणार? असा सवाल केल्याने त्यांनी संतप्त होवून बिलाच्या रकमेसाठी बारातास मृतदेह अडकवून त्याची अवहेलना केल्याने काय होवू शकते याची जाणीव करुन दिल्यानंतर ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सोपवण्यात आला होता.

त्यानंतर आता संबंधित डॉक्टरवर त्यांच्या पत्नीनेच मारहाण, शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यासह ताब्यातील मुलाला सोबत घेवून जाण्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्याने संगमनेरचे डॉ.अतुल आरोटे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या पत्नीने दिलेली तक्रार न्यायालयात सिद्ध झाल्यास दोघांनाही दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह आर्थिक दंडही होवू शकतो. या वृत्ताने संगमनेरच्या वैद्यकिय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

