अकोले तालुक्यातील दोन नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
अकोले तालुक्यातील दोन नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
नगरपंचायत व कारखाना निवडणुकीपूर्वीच वातावरण ढवळायला सुरुवात
नायक वृत्तसेवा, अकोले
आगामी काळातील नगरपंचायत, अगस्ति साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्याचे वातावरण आत्ताच ढवळू लागले आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप नेते माजी आमदार वैभव पिचड यांचे समर्थक ज्येष्ठ नेते मधुकर नवले काँग्रेसच्या वाटेवर असून, हा पिचड यांना मोठा दणका समजला जातो. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले ज्येष्ठ नेते मधुकर नवले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मीननाथ पांडे हे काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे अकोले नगरपंचायत व अगस्ति कारखाना निवडणुकीपूर्वीच हा प्रवेश होत असल्याने या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे.

मधुकर उर्फ भाऊ नवले यांनी 1978 साली लाल निशाण व लाल ध्वज खांद्यावर, लाल सलाम करत भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होेते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले होते. परंतु पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर तेही भाजपमध्ये गेले. भाजप पक्षात ते फार रमले नाहीत. आता त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना नवले म्हणतात, की माजी मंत्री हे आपणाला आजही श्रद्धेय आहेत, मात्र भाजपचे शेतकर्यांबद्दलचे ध्येय-धोरणे मान्य नाही, तर तालुका राष्ट्रवादीबाबत अस्पष्ट भूमिका, केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात त्यांनी टीका केली आहे. त्याचवेळी त्यांचा काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय झाला होता. तर संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक व अगस्ति कारखान्याचे संचालक मीननाथ पांडे यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक म्हणून चाळीस वर्षे काम केले. विधानसभेनंतर राष्ट्रवादीत राहण्याचे ठरविले होते, मात्र राष्ट्रवादीमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही. लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्नांना हात घालून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, तालुक्याच्या पाटपाण्याचा कालव्याच्या प्रश्नाबाबत त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याचे पांडे यांनी सांगितले. या उलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित मदत होईल. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच तारीख घेऊन काँग्रेस पक्षात सहभागी होऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

