कोरड्याठाक असलेल्या प्रवरापात्राने संगमनेरची पूरस्थिती टाळली! म्हाळुंगी वाहतेय एकाकी; फुगवटा नसल्याने नदीकाठावरील वस्त्यांना दिलासा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पावसाच्या कालावधीत संगमनेरातील प्रवरा व म्हाळुंगी या दोन्ही नद्या एकाचवेळी वाहत्या असल्यास पूरस्थिती निर्माण होते असा आजवरचा इतिहास आहे. यंदाच्या वर्षी मात्र जलसंपदा विभागाने अचूक नियोजन करीत गेल्या महिनाभरात भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणांची पाणीपातळी नियंत्रित ठेवल्याने अपेक्षेपूर्वीच धरणांतील पाणीसाठे वाढूनही दरवर्षी पूरस्थितीचा सामना करणार्या प्रवराकाठाला अद्याप पूराचे संकट झेलावे लागले नाही. रविवारपासून पाणलोटातील पावसाला पुन्हा जोर चढल्याने तुडूंब झालेल्या भोजापूर जलाशयाचा ओव्हरफ्लो खळाळत वाहत आहे, मात्र त्याचवेळी प्रवरानदीचे पात्र कोरडेठाक असल्याने संगमापासून म्हाळुंगीच्या पात्रात वाढत जाणारा फुगवटा टळल्याने सध्यातरी संगमनेरच्या म्हाळुंगी काठावरील नागरी वसाहतींना दिलासा मिळत आहे.
विविध वातावरणीय घडामोडींमुळे प्रदीर्घकाळ खोळंबलेल्या मान्सूनचे जुलैच्या सुरुवातीला धरणांच्या पाणलोटात आगमन झाले. सुरुवातीला जेमतेम कोसळणार्या सरींनी दुसर्या आठवड्यापासून मात्र पाणलोट क्षेत्राला अक्षरशः झोडपून काढल्याने मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील तिनही मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात जलदगतीने वाढ झाली. सुरुवातीला भंडारदर्याच्या पाणलोटातील पावसाचा जोर अधिक असल्याने या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु झाल्याने जुलैच्या मध्यातच भंडारदरा धरण तुडूंब भरण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जलसंपदा विभागाने हवामान खात्याकडून प्राप्त अनुमान आणि धरणाची परिचालन सूची यांचा योग्य समन्वय जुळवतांना भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणांचे पाणीसाठे 85 ते 90 टक्क्यांवर नियंत्रित केल्याने अधुनमधून पावसाचा जोर वाढूनही धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची वेळ आली नाही.
जेमतेम पावसाचा परिसर समजल्या जाणार्या आढळा व म्हाळुंगी या नद्यांच्या पाणलोटातही काहीशा विलंबाने मात्र जुलैतच जोरदार आषाढ सरी बरसल्याने ही दोन्ही जलाशये गेल्या महिन्यातच ओव्हर फ्लो झाली व मोठ्या कालावधीनंतर जुलैतच या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहिल्या. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच धरणांची स्थिती समाधानकारक अवस्थेत पोहोचल्यानंतर गेल्या आठवड्यापासून मान्सूनने पाणलोटासह लाभक्षेत्रातही विश्रांती घेतली. त्यामुळे भंडारदर्यातून सोडण्यात येणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करुन तो आजच्या स्थितीत अवघ्या 830 क्यूसेकवर आणण्यात आला, तर निळवंडे धरणातून सोडण्यात येणारे पाणी पूर्णतः बंद करुन निळवंड्याची पातळी वाढवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे गेल्या पंधरवड्याहून अधिक काळापासून दुथडी भरुन वाहणारी प्रवरा आजच्या स्थितीत कोरडीठाक पडली आहे.
या कालावधीतच आढळा व म्हाळुंगी नद्यांच्या खोर्यातील पाऊसही पूर्णतः थांबल्याने नद्यांमधून वाहणारे ओव्हरफ्लोचे पाणीही पूर्णतः आटले होते. मात्र रविवारी (ता.7) अनुराधा नक्षत्राच्या पूर्वाधात मुळा, भंडारदरा, निळवंडे या मोठ्या धरणांसह भोजापूरच्या पाणलोटातही जोरदार पुनरागमन केल्याने आधीच तुडूंब असलेल्या भोजापूर जलाशयात गेल्या अवघ्या 24 तासांतच तब्बल 49 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. हा जलाशय यापूर्वीच तुडूंब झालेला असल्याने धरणात आवक होत असलेले संपूर्ण पाणी धरणाच्या भिंतीवरुन म्हाळुंगी नदीपात्रात कोसळू लागले आहे. त्याचा परिणाम रविवारी म्हाळुंगीच्या पात्रातून वाहणार्या अवघ्या 139 क्यूसेकच्या प्रवाहाने आज (ता.8) सकाळी सहा वाजता 992 क्यूसेकचा वेगवान प्रवाह धारण केला असून म्हाळुंगी नदी पुन्हा एकदा दुथडी भरुन वाहू लागली आहे.
याचवेळी मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही धरणांच्या पाणलोटात पावसाचे पुनरागमन झाले, मात्र जलसंपदा विभागाने पावसाचे प्रमाण कमी-अधिक होवूनही भंडारदरा व निळवंडे धरणांची पाणीसाठे सर्वोच्च पातळीवर जावू न देता 85 ते 90 टक्क्यांदरम्यान नियंत्रित ठेवल्याने रविवारपासून पावसाला पुन्हा जोर चढूनही सुदैवाने या दोन्ही धरणांतून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सध्या या दोन्ही धरणात येणारे नवीन पाणी नदीपात्रात न सोडता धरणांमध्येच रोखले जात आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात 160 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून त्यातील 67 दशलक्ष घनफूट पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले असून 93 दशलक्ष घनफूट पाणी धरणात अडविण्यात आले आहे. तर निळवंडे धरणात एकूण 80 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून संपूर्ण पाणी धरणसाठ्यात अडविण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर या दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदविली गेली आहे.
मुळा खोर्यातही सर्वदूर पावसाचे पुनरागम झाले असून रविवारी सकाळपर्यंत अवघे 704 क्यूसेक पाणी घेवून वाहणारी मुळा आज सकाळी सहा वाजता 6 हजार 260 क्यूसेकच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे मुळा धरणाच्या पाणीसाठ्यातही आता पुन्हा एकदा भर पडू लागली असून गेल्या चोवीस तासांत धरणात 123 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. आढळा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरु असला तरीही त्याला अजिबातच जोर नसल्याने गेल्या चोवीस तासांत आढळा धरणात अवघे सहा दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले असून नदीपात्रातून अवघा एक ओघळ तर कालव्याद्वारे 45 क्यूसेक पाणी सोडले जात आहे.
संगमनेरची पूरनियंत्रण रेषा निश्चित नसली तरीही ज्यावेळी प्रवरा नदीपात्रातून 35 हजार क्यूसेकपेक्षा अधिक प्रवाह असतो तेव्हा नदीकाठावरील लोकवस्तीला धोका संभवत असतो. याचवेळी म्हाळुंगी नदीतूनही प्रवाह वाहत असला तर संगमनेरजवळील संगमावर प्रवरेचा वेगवान प्रवाह म्हाळुंगीच्या पाण्याला वाट देत नाही. त्याचा परिणाम म्हाळुंगीचा फुगवटा वाढण्यात व फुगलेल्या नदीपात्रातील पाणी अच्चुतनगर, वाल्मीकी-आंबेडकर वसाहत, साईनगर व हिरेमळ्याचा परिसर आणि अकोले नाक्यावरील नदीपात्रात वसलेल्या वसाहतींमध्ये पाणी शिरते व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदाच्या वर्षी मात्र जलसंपदाच्या सुयोग्य नियोजनाने गेल्या महिन्याभरात अनेकदा पुरस्थिती निर्माण होण्याचा प्रसंग निर्माण होवूनही सर्वसामान्यांना त्याचा फटका बसला नाही. मात्र लहरी पावसाचा आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेता यापुढील काळात पावसाचा जोर वाढत राहील्यास संगमनेरला पूरस्थितीचा सामना करावा लागेल.
गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस व धरणांतील पाणीसाठे पुढीलप्रमाणे – घाटघर 168 मि.मी, रतनवाडी 81 मि.मी, भंडारदरा 51 मि.मी, वाकी 37 मि.मी, निळवंडे 59 मि.मी, मुळा (धरण) 14 मि.मी, आढळा 10 मि.मी, कोतुळ 58 मि.मी, अकोले 48 मि.मी, संगमनेर 16 मि.मी, श्रीरामपूर 9 मि.मी, शिर्डी 130 मि.मी, राहाता 34 मि.मी, कोपरगाव 35 मि.मी, राहुरी 20 मि.मी. व नेवासा सात मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी 6 वाजता मुळा धरणात 20 हजार 400 दशलक्ष घनफूट (78.46 टक्के), भंडारदरा 9 हजार 368 दशलक्ष घनफूट (84.86 टक्के) व निळवंडे धरणाचा पाणीसाठा 7 हजार 285 दशलक्ष घनफूट (87.56 टक्के) इतका होता.