चौपन्न दिवसांत ओसरली जिल्ह्यातील संक्रमणाची तिसरी लाट! महापालिका क्षेत्रात लक्षणीय पीछेहाट; अन्य तालुक्यांमध्येही निम्म्याहून अधिक संख्या घटली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येणारऽ येणारऽ म्हणून मोठा गाजावाजा झालेली कोविड संक्रमणाची तिसरी लाट जिल्ह्यातून ओसरली आहे. गेल्या अवघ्या चौपन्न दिवसांतच कोविडने जिल्ह्याला संक्रमणाच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यामुळे जिल्हा यंत्रणा सतर्क झाली होती, मात्र दुसर्या लाटेप्रमाणे या संक्रमणातून फारशा गंभीर गोष्टी समोर आल्या नाहीत. त्यामुळे एकीकडे दररोज समोर येणार्या रुग्णांचे आकडे फुगत असतांनाही रुग्णालये मात्र ओस असल्याचे चित्र बघायला मिळाले. तिसर्या संक्रमणाचा सर्वाधीक फटका महापालिका क्षेत्राला बसला तर दुसर्या लाटेत त्राही उडालेल्या कर्जत, संगमनेर व जामखेड तालुक्यातील संक्रमणाचा वेग मात्र कमलीचा मर्यादेत राहीला. संक्रमणाच्या दुसर्या लाटेत राज्यात शेवटपर्यंत चर्चेत राहीलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही आता पन्नाशीच्या आंत आल्याने राज्यासह जिल्ह्यातील कोविडची तिसरी लाट ओसरली आहे.

सन 2020 च्या सुरुवातीलाच देशात धडकलेल्या कोविडने नागरीकांच्या मनात मोठी भिती निर्माण केली होती. सुरुवातीला कोविडबाबत असलेली त्रोटक माहिती, उपचारांच्या पद्धती आणि औषधे याबाबत खुद्द वैद्यकीय क्षेत्रच गोंधळलेले होते. त्यामुळे बहुसंख्य खासगी डॉक्टरांनी ‘स्वीच ऑफ’चा पर्याय निवडून अज्ञातवास पत्करल्याचे भयानक चित्र त्याकाळात नागरीकांनी अनुभवले. मात्र केंद्राकडून सुमारे अडीच महिने लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी झाल्याने संक्रमणाचा फार मोठा परिणाम पहिल्या लाटेत दिसला नाही. त्या पार्श्वभूमीवर दुसर्या संक्रमणातील अवस्था बिकट असेल असे जागतिक आरोग्य संघटनेसह देशातील टास्क फोर्सद्वारा सांगितले गेले.

या अंदाजांचा कालावधी चुकला खरा मात्र तिसर्या संक्र्रमणाची दाहकता यासर्वांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक प्रलंयकारी ठरली. देशात कोविड दाखल झाल्याच्या बरोबर वर्षपूर्तीलाच संक्रमणाची दुसरी लाट उसळली आणि गेल्या वर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यातच देशाने कोविडचे प्रचंड आक्रमण अनुभवले. या कालावधीत लाखों नागरीकांना संक्रमण होवून दररोज शेकडोने माणसे दगावली. सर्वसामान्य माणसांनी आयुष्यभर जमा केलेली पुंजी कोविडवरील उपचारांमध्ये खर्च झाली. अनेकांना रुग्णालयात उपचारांसाठी तिष्ठावे लागले, तर काहींना रुग्णालयात जागाच मिळाली नाही. देशात पहिल्यांदाच ऑक्सिजनसाठी मारामार झाल्याचेही भयानक चित्र या संक्रमणातून देशासमोर उभे राहिले.

या सर्व गोष्टींचा बोध घेवून जागतिक आरोग्य संघटना व देशातील टास्क फोर्सद्वारा तिसर्या लाटेच्या तयारीच्या सूचना दिल्या गेल्याने राज्याने ऑक्सिजन तुटवड्याचा अनुभव लक्षात घेता राज्यातील ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढविण्यासह जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालयांपासून ते खासगी रुग्णालयांपर्यंत विविध ठिकाणी रुग्णालयांना ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्चही करण्यात आला. याच कालावधीत राज्य सरकारने राज्यातील अनेक ग्रामीण रुग्णालयांच्या श्रेणी वाढवून त्यांना उपजिल्हा रुग्णालयांचा दर्जा देत तेथील खाटांची संख्या दुपटीहून अधिक वाढवली. राज्यात सर्वत्र औषधे व लशींचा पुरवठा वाढला, लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला.

ठरल्याप्रमाणे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेने जिल्ह्यात पाय पसरायला सुरुवात केली. याचा सर्वाधीक फटका अहमदनगर महापालिका क्षेत्रासह राहाता, नगर तालुका, श्रीगोंदा, श्रीरामपूर, अकोले, पारनेर व पाथर्डी या तालुक्यांना बसला. तर दुसर्या संक्रमणात आरोग्य सुविधांसी ऑक्सिजनची वाणवा जाणवणार्या जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, नेवासा, शेवगाव, संगमनेर व राहुरी तालुक्यातील संक्रमण मात्र वाढूनही ते अपेक्षेपेक्षा खुप कमी राहीले. या गोष्टींना जिल्ह्यात केवळ कोपरगाव तालुका अपवाद राहिला. जानेवारीत कोपरगावमध्ये 671 रुग्ण आढळले होते, तर फेब्रुवारीत त्यात आणखी भर पडून एकूण 845 रुग्ण आढळले. कोविडच्या तिसर्या संक्रमणात दुसर्या लाटेच्या तुलनेत आरोग्य सुविधांसह ऑक्सिजनचा मुबलक साठा असूनही त्याचा फारसा वापरही झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोविडची तिसरी लाट उसळली खरी मात्र या लाटेची दाहकता सुरुवातीच्या दोनही लाटांपेक्षा खुपच सौम्य असल्याचेही स्पष्ट झाले.

जानेवारीत जिल्ह्यात सरासरी 773 रुग्ण दररोज या सरारीने 3 हजार 953 रुग्णांची भर पडली होती. त्यात सर्वाधिक 8 हजार 4 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातून समोर आले होते. राहाता, नगर तालुका, श्रीगोंदा, श्रीरामपूर, अकोले, पारनेर व पाथर्डी या तालुक्यांमधूनही जानेवारीत बाराशेहून अधिक रुग्ण समोर आले. तर फेब्रुवारीत अहमदनगर महापालिका क्षेत्रातून 2 हजार 710 व राहाता तालुक्यातून 1 हजार 273 रुग्ण वगळता उर्वरीत संपूर्ण जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या तीन आकड्यांतच राहीली. त्यातही सर्वात कमी रुग्ण आढळलेल्या तालुक्यांमध्ये कर्जत, संगमनेर व जामखेड या तीन तालुक्यांचा समावेश होता. फेब्रुवारी संपतासंपता संक्रमणाची तिसरी लाटही ओसली असून महिन्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात अवघे 49 तर मार्चच्या आजच्या पहिल्या दिवशी 70 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आज 70 रुग्ण..
गेल्या 25 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची गती मंदावली असून दररोजची रुग्णसंख्या तीन आकड्यात आली आहे. सोमवारी जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पन्नाशीत आली होती, आज मात्र त्यात काहीशी वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज एकूण 70 रुग्ण समोर आले असून त्यात कोपरगाव 15, अहमदनगर महापालिका क्षेत्र 13, राहाता 12, पारनेर, श्रीगोंदा व श्रीरामपूरमधून प्रत्येकी 3, अकोले, जामखेड, नेवासा, पाथर्डीसह, इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रत्येकी एक तर कर्जत, राहुरीसह भिंगार लष्करी क्षेत्र व लष्करी रुग्णालयाची रुग्णसंख्या शून्य झाली आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 93 हजार 976 झाली असून आत्तापर्यंत 3 लाख 86 हजार 118 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 222 रुग्णांचा बळी गेला असून सध्या जिल्ह्यात अवघे सहाशे रुग्ण सक्रीय आहेत.

