दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांची आतषबाजी! व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण; गस्त वाढवण्याची मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा दिवाळी सण असल्याने संगमनेरातील व्यापार्‍यांमध्ये मोठा उत्साह आहे. अशा स्थितीत जवळपास सर्वच छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांनी आपापल्या दुकानात मोठ्या प्रमाणात माल भरुन ठेवला असून प्रत्येकाला ग्राहकांची प्रतिक्षा आहे. मात्र त्याचवेळी ऐन दिवाळीच्या कालावधीत शहराच्या विविधभागात चोरट्यांनी आतषबाजी सुरु केल्याने व्यापार्‍यांसह नागरिकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. त्यात भर घालणार्‍या एकामागोमाग चार घटना गुरुवारी समोर आल्या असून त्यातील तीन घटनांमध्ये दुचाकीची चोरी तर चौथ्या घटनेत जाणताराजा मैदानाजवळील नामांकित दर्शन टेक्सटाईल मार्केट या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 90 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब केला. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात चोरट्यांनी सीसीटीव्ही, डिव्हीआरसह महिलांचे अठरा ड्रेसही लंपास केले.


याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना गुरुवारी (ता.17) पहाटेच्या सुमारास जाणता राजा मैदानाजवळील दर्शन टेक्सटाईल मार्केट या नावाजलेल्या कापड दुकानात घडली. पहाटे चारच्या सुमारास दोघा चोरट्यांनी सुरुवातीला दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची वाट लावल्यानंतर दुकानाच्या शटरची पट्टी तोडून एकाने आंत प्रवेश केला तर, दुसरा राखण करण्यासाठी बाहेरच थांबला. आंत शिरलेल्या चोरट्याने दुकानाची माहिती असल्यागत थेट गल्ला असलेल्या टेबलजवळ येवून सुरुवातीला गल्ल्यातील सामानाची उचकापाचक करीत त्यात ठेवलेली सुमारे 59 हजार 468 रुपयांची रोकड चोरली.


त्यानंतर पैशांच्या लालसेने इतरत्र सामानाची उचकापाचक केल्यानंतर जाताजाता त्याने महिलांसाठीचे 18 हजार 394 रुपये किंमत असलेले एकूण 18 ड्रेसही चोरले व शेवटी सीसीटीव्हीचा एक डिव्हीआर, हार्डडिस्क व स्वीच राऊटर असा एकूण 89 हजार 962 रुपयांचा मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुकानातील कर्मचारी कामावर आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी दुकानाचे मालक गुरुप्रीतसिंग इंद्रजीत पंजाबी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.


या घटनेच्या आधी तीन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागातून मोटार सायकल लांबविण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यात कुरिअर सेवेचे काम करणार्‍या अझहर निजाम शेख (रा.विद्यानगर) यांची प्लॅटीना (क्र.एम.एच.17/डी.डी.2562), श्याम विलास गुंजाळ (रा.खांडगाव) यांची होंडा डिलक्स (क्र.एम.एच.17/सी.एन.0254) व नगरपालिकेचे कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ (रा.पंचायत समितीच्या पाठीमागे) यांची पॅशन-प्रो (क्र.एम.एच.17/ए.क्यू.0851) अशा तीन मोटर सायकलचीही चोरी झाली आहे. दुचाकी चोरीचे प्रकार तर अव्याहतपणे सुरुच असून दर्शन टेक्सटाईल मार्केटमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणात यातील एखादी दुचाकी वापरली गेली असण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.


मात्र दुचाकी चोरीच्या नियमित घटनांसह आता शहरातील दाटीने लोकवस्ती असलेल्या भागातील दुकानांचे शटर तोडून चोरीच्या घटना घडू लागल्याने व्यापारी वर्गाची चिंता वाढली आहे. त्यातच सध्या दिवाळीचा पंधरवडा सुरु झाल्याने बहुतेक सर्वच व्यापार्‍यांनी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात माल भरुन ठेवला आहे. चोरट्यांकडून रोकडसह आता दुकानातील मालावरही डल्ला मारला जावू लागल्याने व्यापार्‍यांचे तिहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे पोलिसांनी किमान दुकानांची गजबज असलेल्या रस्त्यांवर रात्रीचा बंदोबस्त ठेवण्यासह गस्तही वाढवण्याची मागणी होत आहे.


पोलीस उपअधिक्षक अजय देवरे, अशोक थोरात, रोशन पंडित, राहुल मदने व सोमनाथ वाघचौरे या चार अधिकार्‍यांनी संगमनेरकर व्यापार्‍यांना आग्रह करुन आपापल्या दुकानांसमोर सीसीटीव्ही लावण्यास प्रोत्साहन दिले. त्यातून अनेकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘एक कॅमेरा पोलिसांचा’ या भावनेला खतपाणी घातले. शहरात घडणार्‍या बहुतेक दुचाकी चोरीच्या घटना आणि अलिकडच्या काळात शहरात सुरु झालेल्या चोर्‍यांचे बहुतेक प्रकारही या सीसीटीव्हींनी अचूक टीपले. मात्र कॅमेर्‍यांसाठी आग्रह धरणार्‍या पोलिसांकडून चोरीच्या घटनांचे तपास मात्र तितक्या गांभीर्याने केले जात नसल्याने व्यापारी वर्गातून नाराजीचा सूरही उमटत आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 79769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *