पुणतांबा येथील फळ्या चोरीचा तपास तातडीने लावा! शेतकर्यांच्या शिष्टमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षिकांना निवेदन

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पुणतांबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यात पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणार्या लोखंडी फळ्यांच्या चोरीचा तातडीने तपास लावला नाही तर शेतकर्यांनी उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अशाप्रकारचे लेखी निवदेन शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूर येथे जावून अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना दिले.

पुणतांबा बंधार्याच्या अंदाजे 34 लाख रुपये किमतीच्या 301 फळ्या चोरीस गेलेल्या आहेत. फळ्यांची टप्प्याटप्प्याने चोरी झालेली आहे. सुरुवातीला 30 फळ्यांची चोरी झाली होती. त्याबाबत 2 ऑगस्ट रोजी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. 15 ऑगस्टला संभाजी गमे या शेतकर्याच्या सतर्कतेमुळे फळ्यांची चोरी करणारे आठ चोरटे टेम्पोसह डोणगाव शिवारात पकडून त्यांना राहाता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र पोलिसांना अद्यापही चोरीचे पूर्ण रॅकेट सापडले नसून पूर्ण मुद्देमालही हाती लागलेला नाही. तपास अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचा शेतकर्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे 105 किलो वजनाच्या लोखंडी फळीचे सरकारी मूल्य 11 हजार 400 रुपये असताना त्याचे मूल्य अवघे 3000 रुपये नमूद केल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या चोरीच्या प्रकरणात आरोपींवर दरोड्याची कलमे लावावीत, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, उपसरपंच महेश चव्हाण, शिवसेनेचे सुहास वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, रामभाऊ बोरबने, गणपत बोरबने, नामदेव गायकवाड, प्रताप वहाडणे, प्रभाकर बोरबने, चांगदेव बोरबने, रवी जेजूरकर यांसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी गुन्ह्याचा योग्य पद्धतीने लवकर तपास लावण्याचे आश्वासन भोर यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिष्टमंडळात बंधारा समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव, सुभाष वहाडणे, धनंजय जाधव, संभाजी गमे, उपसरपंच महेश चव्हाण, चंद्रकात वाटेकर, गणेश बनकर यांसह शेतकरी होते. बंधार्याच्या फळ्यांच्या चोरीप्रकरणी शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचीही भेट घेतली आहे. दरम्यान, फळ्यांच्या चोरीचा तपास लवकर लागला नाही तर सप्टेंबरमध्ये बंधार्यात पाणी अडविणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्याचा फटका अंदाजे 3 हजार एकर क्षेत्राला होणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर पुणतांबा, डोणगाव, रास्तापूरसह अनेक गावांतील शेतकरी एकत्रित आले आहेत.
