संगमनेरचे जावेद हबीब सलुन ‘एमडी’ वितरणाचे केंद्र? पकडलेल्या आरोपीकडून 103 ग्रॅम हस्तगत; मोबाईलमधून उलगडणार तस्करीचे नेटवर्क..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही महिन्यांपासून संगमनेरला बसलेला अमली पदार्थांच्या तस्करीचा विळखा अधिक घट्ट झाला असून शहरात गांजा, चरस पाठोपाठ आता चक्क एमडी या अतिशय घातक असलेल्या अमलीपदार्थाच्या तस्करीचाही समावेश झाला आहे. आजच्या तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी ढकलून बर्बादीच्या दिशेने घेवून जाणार्‍या या पांढर्‍या रंगाच्या मादक पावडरची महागडी खेप शहर पोलिसांनी पकडली असून त्यातून संगमनेरात या घातक पदार्थाची विक्री आणि सेवन जोमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक म्हणजे शहर पोलिसांनी आज पहाटे केलेल्या धडक कारवाईत आशिष सुनीलदत्त मेहेरे या 28 वर्षीय नाशिकच्या एमडी तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याच्या प्राथमिक चौकशीतून तो ‘जावेद हबीब’ या राज्यभर गाजलेल्या ‘युनिसेक्स’ सलुनचा संगमनेरातील संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरुन सदरील आरोपी या मादक पदार्थाच्या वितरण व विक्रीसाठी याच सलुनचा वापर करीत असावा असा संशय निर्माण झाला असून त्यातून अलिकडच्या काळात फोफावलेली ‘युनिसेक्स’ व्यायाम व सलुन पद्धतीही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पोलिसांनी आरोपीचे महागडे मोबाईल ताब्यात घेतले असून त्यातून त्याचे संपूर्ण ‘नेटवर्क’ समोर येण्याची दाट शक्यता आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.21) पहाटे चारच्या सुमारास नाशिक रस्त्यावरील परिवार किराणा शॉपीच्या पाठीमागील बाजूस करण्यात आली. याबाबत संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार मूळच्या नाशिकच्या मात्र गेल्या मोठ्या कालावधीपासून संगमनेरातच वास्तव्यास असलेला 28 ते 30 वयोगटातील सावळ्या वर्णाचा तरुण अन्य ठिकाणांहून ‘एमडी’ आणून संगमनेरात त्याची विक्री करीत असल्याचे व आजरोजी तो मोठी खेप घेवून पहाटे शहरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज पहाटे दीडच्या सुमारास गणेशनगर भागातील अंतर्गत रस्त्यावर नाकाबंदी करीत मिळालेल्या वर्णनाच्या वाहनाची प्रतिक्षा सुरु केली.


सापळा रचल्यानंतर काही वेळातच पोलिसांना मिळालेल्या वर्णनानुसार संशयीत असलेली चंदेरी रंगाची आलिशान कार नाशिकच्या दिशेने येवून थांबली व त्यातून एक संशयीत खाली उतरला व काही अंतर पायी चालत जावून तो परिवार किराणा जवळ येवून थांबला. यावेळी त्याच्या शारीरिक हालचालींवरुन तो कोणाची तरी प्रतिक्षा करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले, त्यामुळे पथकातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी एखादा ग्राहकही जाळ्यात अडकेल या आशेवर काहीवेळ त्याच्या हालचालींवर करडी नजर रोखली. मात्र बराचवेळ थांबूनही कोणीच येत नसल्याने सदरील संशयीत इसम निघून जाण्याच्या तयारीत असतानाच चोहोबाजूला दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी एकाचवेळी धावा करीत त्याला जागीच रोखले व ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली.


सुरुवातीला आपल्याच अंदाजात असलेल्या ‘त्या’ तस्कराने काहीक्षण आडेवेढे घेण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच तो सुतासारखा सरळ झाला. सुरुवातीला पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी त्याला ओळख विचारली असता त्याने आपण मूळ नाशिकमधील ‘14, पुष्पकुटी बंगला, शिवाजीनगर, सातपूर’ येथील रहिवाशी असल्याचे व सलुन व्यवसाय करीत असल्याची माहिती दिली. सदरील तरुण पदवीधर असून त्याला इंग्रजी, मराठी व हिंदी या भाषा अवगत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. कायदेशीर सोपस्कार आटोपून पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या उजव्या शिखात प्लॅस्टिकच्या पिशवीत पांढर्‍या रंगाची पावडर असल्याचे आढळून आले. त्याबाबत विचारणा करता त्याने उडवाउडवी करण्यास सुरुवात केली.


मिळालेल्या माहितीनुसार मोहीम फत्ते झाल्याने पोलिसांनी आरोपी आशिष मेहेरेच्या आलिशान फॉर्च्युनर (क्र.एम.एच.15/एफ.एफ.9630) या वाहनाची झडती घेतली. त्यात चालका शेजारील सीटसमोर असलेल्या डीकीत काही पॅकबंद केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळल्या. त्याची तपासणी करता त्यातही पांढर्‍या रंगाची व वजनाने जड असलेली पावडर सापडली. आरोपीच्या अंगझडतीसह त्याच्या वाहनातून मिळालेल्या ‘त्या’ पांढर्‍या पावडरचे वजन केले असता ते 103 ग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले. बाजारभावाने हा अमलीपदार्थ तीन हजार रुपये प्रति ग्रॅम या दराने विकला जातो व त्याची एकत्रित किंमत तीन लाख नऊ हजार इतकी असल्याचे समोर आल्यानंतर मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले.


या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात एनडीपीएस अंतर्गत गुन्ह्याची नोंद करुन आज सकाळी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 3 लाख 9 हजार रुपयांच्या एमडी पावडरसह 40 लाख रुपये किंमतीचे फॉर्च्युनर वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडे अतिशय महागड्या कंपनीचे मोबाईलही आढळले असून त्यांना सुरक्षा कोड असल्याने तूर्त त्यातून फारकाही समोर आलेले नाही. मात्र त्याच्या मोबाईलच्या सखोल तपासातून जावेद हबीब या प्रसिद्ध नावाने फ्रेंचाईजी घेवून त्याच्या आडून अमलीपदार्थ तस्करीचे संपूर्ण रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता आहे.


गेल्याकाही काळापासून संगमनेरातील अवैध व्यावसायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गांजासारख्या अमलीपदार्थाच्या सहज उपलब्धतेतून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली असून राजरोस पानटपर्‍यांवर मिळणार्‍या गांजा भरलेल्या सिगारेटमुळे दिवसोंदिवस नशेखोरांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यात आता एमडीसारख्या अतिशय घातक अमलीपदार्थाचे संगमनेरातील नेटवर्कही समोर आल्याने नशेच्या या बाजारात स्थानिक पातळीवरील आणखी कोण कोण अडकले आहेत यावरुन शहरात चर्चेचे फड रंगले असून ऐन निवडणुकीच्या काळात ‘उडता संगमनेर’ असे म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.


संगमनेर पोलिसांनी ‘एमडी’ तस्करीत पडकलेला आरोपी आशिष सुनीलदत्त मेहेरे (वय 28, रा.सातपूर, नाशिक) हा संगमनेरात जावेद हबीब नावाचे ‘युनिसेक्स’ सलुन चालवतो. राज्यभर लौकीक असलेल्या या सलुनमध्ये महिला व पुरुष अशा दोहींसाठी केशरचनेची सुविधा उपलब्ध असल्याने व कारागिरही पुरुषच असल्याने त्यावरुन संगमनेरात मोठा विरोधही झाला होता. मात्र त्या उपरांतही सुरु झालेल्या या केशकर्तनालयात मध्यंतरी एका तरुणीचा विनयभंग होण्याचा प्रकार घडला होता, तर आता थेट या सलुनचा स्थानिक संचालक एमडी तस्करीत गुंतल्याचे समोर आल्याने संगमनेरचे जावेद हबीब सलुन एमडीची साठवणूक, वितरण व विक्रीचे केंद्र तर नव्हते? अशी दाट शंका निर्माण झाली असून पोलिसांनी प्रामाणिक तपास केल्यास या प्रकरणातून संगमनेरातील या घातक अमलीपदार्थाचे संपूर्ण नेटवर्क उध्वस्थ होवू शकते.

Visits: 94 Today: 1 Total: 1105573

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *