मेहतर समाजाचा मतदानावर बहिष्काराचा इशारा! अन्याय झाल्याची भावना; बाहेरचा उमेदवार दिल्याचा रोष..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांची मोठी भरमार असल्याचे आता प्रखरपणे समोर येवू लागले आहे. राजकीय महत्वकांक्षा बाळगून एखाद्या पक्षाचे तिकिटं मिळवायचे आणि नगरसेवक म्हणून मिरवायचे या हौसेखातर अनेकांनी गेल्या आठ दिवस जीवाचा अक्षरशः आटापीटा केला. सरतेशेवटी मात्र पक्षाने डावलल्याने अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांचे अक्षरशः पिकं आले आहे. अशातच शब्द देवूनही ऐनवेळी बाहेरचा उमेदवार दिल्याची व समाजावरील अन्यायाची परंपरा कायम राहील्याची भावना बाळगून प्रभाग क्रमांक 13 मध्ये मोठी संख्या असलेल्या वाल्मीकी-मेहतर समाजाने मतदानावरच बहिष्काराचा इशारा दिला आहे. सोमवारी समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्यानंतर तशा आशयाचा मजकूर असलेले फ्लेक्सही परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे संगमनेरची निवडणूक सुरु होण्यापूर्वीच तापली आहे.


यावेळी इच्छुकांची भाऊगर्दी पाहता संगमनेर सेवा समितीसह महायुतीकडून उमेदवारांच्या नावांबाबत शेवटपर्यंत गोपनीयता पाळली गेली. या दरम्यान इच्छुकांना नाराज न करता त्यांना कुरवाळून झुलत ठेवले गेल्याने आपण ‘फिक्स’ असा मनोमन समज करुन अनेकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीही वाढवली होती. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांनाच तयारीत रहा म्हणत दोन्हीकडून ऐनवेळी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवली गेली. मात्र या उपरांतही अनेक प्रभागांमध्ये ‘अपक्ष’ उमेदवारांचे अक्षरशः पिकं आले असून प्रभाग क्रमांक 13 मध्येही अशीच स्थिती आहे. अनुसूचित जातीचे (महिला) आरक्षण असलेल्या या प्रभागात यावेळी महायुतीकडून मेहतर समाजाला प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा होती.


यासाठी प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी महायुतीच्या कार्यालयात खेट्याही घातल्या. प्रत्येकवेळी आश्‍वासन देवून तयारीत राहण्याच्या सूचना दिल्याने समाज गाफील राहीला व ऐनवेळी बाहेरील उमेदवार थोपण्यात आला असा आरोप पप्पू तेजीसह काहींनी केला. समाजातील अन्य काही इच्छुकांनी इतर मार्गाने उमेदवारीचाही प्रयत्न केला, मात्र त्यांचीही निराशा झाली. यासर्व घडामोडी समाजावर नेहमी अन्याय होत असल्याची भावना निर्माण करणार्‍या ठरल्या. सोमवारी रात्री समाजाच्या वाल्मीक मंदिरात सकल समाजाची बैठक झाली. त्यात अनेकांनी रोष व्यक्त करीत आपल्या मताची ताकद दाखवण्याची हीच वेळ असल्याचे मत मांडले.


समाजातील तरुणांसह सर्वांचाच रोष पाहता महर्षी वाल्मीक सकळ पंच, वाल्मीक मेहतर समाजाने यावेळच्या मतदानावरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रभागातील निवडणुकीची गणितं बिघडण्याची शक्यता असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धावपळ वाढणार आहे. विशेष म्हणजे या प्रभागात महिला प्रवर्गासाठी शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांसह चार अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, सर्वसाधारण गटातही नऊजणांचे अर्ज दाखल आहेत. यातून यावेळच्या इच्छुकांची संख्या आणि उमेदवारी नाकारल्यानंतर उमटणार्‍या प्रतिक्रिया दोन्ही बघायला मिळत आहेत.


संगमनेर शहराच्या जडणघडणीत अविरत सहभाग असलेल्या मेहतर समाजाची संगमनेरात व विशेषतः वाल्मीक चौक व इंदिरा वसाहत परिसरात मोठी रहिवाशी संख्या आहे. अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मधील महिला राखीव जागेवर मेहतर समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे अशी त्या समाजाला यावेळी अपेक्षा होती. कविता पप्पू तेजी यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याचे संकेतही देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांची पत्नी प्राची यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे समाजात अन्यायाची भावना निर्माण झाली असून त्याचा रोष म्हणून मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Visits: 35 Today: 1 Total: 1104056

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *