सामोपचाराने मिटलेल्या विषयाची खोटी तक्रार दाखल केली : थोरात सुसंस्कृत राजकारणात अशाप्रकारच्या गोष्टी आमच्याकडून घडण्याची शक्यता नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
या संपूर्ण घटनाक्रमाबाबत सुरेश थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून पिंपरणे येथील पत्रकार स्वानंद चत्तर यांनी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्याबाबत अतिशय खालच्या पातळीवर जावून टीका केल्याचे म्हंटले आहे. आमदार थोरात सुसंस्कृत राजकारणी म्हणून राज्यात ओळखले जात असताना त्यांच्यावर अशा प्रकारच्या शब्दात टीका केल्याने संबंधित पत्रकारास समाजावून सांगण्यासाठी आम्ही काहीजण त्यांच्या घरी गेलो होतो. आमदार साहेबांच्या संस्कारानुसारच आम्ही अतिशय विनम्रपणे संबंधित पत्रकाराची चूक त्याच्या वडिलांच्या लक्षात आणून दिली. त्यावर त्यांनीही त्याच्याकडून पुन्हा अशी चूक घडणार नसल्याची ग्वाही दिल्याने हा विषय सामोपचाराने मिटलेला असताना तालुका पोलिसांकडे देण्यात आलेली तक्रार चुकीची आणि कल्पित स्वरुपाची असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
याबाबत आपली प्रतिक्रिया देताना सुरेश थोरात म्हणाले की, स्वानंद चतर या पत्रकाराने गुरुवारी (ता.18) विधीमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या भाषणाबाबत फेसबुक या सोशल माध्यमावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी केली. ही गोष्ट संगमनेर तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधित पत्रकाराच्या ‘त्या’ टिपण्णीवरुन सर्वसामान्य मानसाच्या मनात रोष निर्माण झाला आहे. आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठनेते असून त्यांचे संयमी व्यक्तिमत्व व सुसंस्कृतपणा संपूर्ण राज्याला माहित आहे. अजित पवारही राज्याच्या राजकारणातील मोठे व्यक्तिमत्व आहे. अशा मोठ्या आणि आदरणीय व्यक्तींबद्दल नवख्या आणि प्रसिद्धीलोलुप असलेल्या स्वानंद चत्तर या भाडोत्री पत्रकाराने चुकीचे लिहिणे अतिशय दुर्देवी वाटल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
याबाबत संबंधित पत्रकाराला समज देणे आवश्यक असल्याने आम्ही गावातील काही नागरीकांसह अत्यंत सूज्ञपणे त्याच्या घरी जावून त्याच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन चर्चा केली. यावेळी त्या पत्रकाराने फेसबुकवर लिहिलेली प्रतिक्रिया त्यांना दाखवली असता त्यांनीही त्याची चूक असल्याचे मान्य केल्याचे थोरात यांनी सांगितले. स्वानंद चत्तर याचे वय अवघे पंचवीस वर्षांचे आहे तर थोरात साहेबांचे राजकारण पाच दशकांचे आहे. त्यामुळे त्याला समजावून सांगावे अशी विनंती आम्ही सर्वांनी त्याच्या आई-वडिलांना केल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. आपल्या मुलाकडून चूक झाल्याचे व यानंतर पुन्हा त्याच्याकडून असे होणार नाही अशी ग्वाही त्याच्या आई-वडिलांकडून मिळाल्यानंतर आमच्यासाठी तो विषय तेथेच सामोपचाराने संपला होता.
परंतु, या घटनेतून आपण सवंग प्रसिद्धीच्या झोतात येऊ या हेतूने संबंधित पत्रकाराने या प्रकरणाला पूर्णपणे राजकीय वळण दिले. त्याने केलेले आरोप निराधार व चुकीचे आहे. यावेळी गावातील अनेक पदाधिकारी व त्या पत्रकाराचे नातेवाईकही तेथे हजर होते. त्यामुळे त्याने केलेले आरोप हास्यास्पद असून आमच्यावर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, आमदार बाळासाहेब थोरात यांचे संस्कार असल्याने आमच्याकडून कोणाला दमबाजी अथवा शिवीगाळ होण्याची कल्पनाही कोणी करणार नाही असेही सुरेश थोरात यांनी या विषयावरील प्रतिक्रिया देताना सांगितले. तालुका पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करुन त्यातील सत्य जनतेसमोर आणण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.