संगमनेरच्या नगराध्यक्षपदासाठी सोळाजणांची उमेदवारी! महायुतीचे सर्व घटकपक्ष मैदानात; माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रचंड उत्सुकता ताणलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांसह तब्बल 15 जणांनी 19 उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात संगमनेर सेवा समितीकडून मैथिली तांबे व अंजली उर्फ दूर्गा तांबे यांच्यासह शिवसेनेकडून सुवर्णा खताळ व सुनिता केसेकर, भाजपकडून सुजाता देशमुख आणि राष्ट्रवादीकडून रुपाली पवार यांच्यासह बारा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. मंगळवारी दाखल अर्जांच्या छाननीनंतर शुक्रवारपर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल, त्यानंतरच संगमनेरच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. सुकाणू समितीची रचना, मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत तीन पातळ्यांवर नावांची पडताळणी अशा बढाया मारणार्‍या महायुतीत मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वकाही आलबेल नसल्याचेही समोर आले. त्यातूनच ऐनवेळी आमदार अमोल खताळ यांच्या वहिणी सुवर्णा खताळ यांचे नाव पुढे करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे.


मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा इच्छुकांची मोठी संख्या असल्याचे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. त्याचा परिणाम सत्ताधारी गटासह विरोधी महायुतीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी आणि त्यांच्या नावाभोवतीचे वलय पडताळताना मोठी गोपनीयता पाळण्यात आली होती. त्यातही महायुतीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी घटकपक्षांसोबत कटुता येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना करीत शक्यतो एकत्रित लढण्याचे संकेतही दिले होते. त्यामुळे यावेळची निवडणूक रंगतदार होईल असे वाटत असताना स्थानिक महायुतीच्या पदाधिकार्‍यांमध्ये मात्र नावे अंतिम करताना गोंधळ निर्माण झाल्याने अनेकांना नाराज होवून घरी परतावे लागले.


त्यातही महायुतीकडून सुरुवातीपासूनच ‘एकविचारा’चा दाखला दिला जावूनही प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करताना मात्र ‘त्या’ विचाराची वाणवा बघायला मिळाली. त्याचा परिणाम महायुतीमधील तिनही प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले असून तब्बल डझनभर महिलांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आज उमेदवारी दाखल करणार्‍यांमध्ये संगमनेर सेवा समितीच्यावतीने मैथिली सत्यजीत तांबे यांच्या दोन अर्जांसह माजी नगराध्यक्षा अंजली उर्फ दूर्गा सुधीर तांबे, शिवसेनेकडून सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांचे दोन अर्ज,


भारतीय जनता पक्षाकडून सुजाता राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) रुपाली कपिलेश्‍वर पवार, शिवसेनेकडून सुनिता कैलास केसेकर या पक्षीय उमेदवारांसह माजी नगरसेविका सुषमा संजय तवरेज (दोन अर्ज), शबाना रईस बेपारी, आलिया शौकतअली सय्यद, तबस्सुम महंमद शरीफ शेख, रुपाली संग्राम जोंधळे, मेघा दीपक भगत, अफसाना इलियास शेख, बानोबी लियाकत शेख, रेखा संपत गलांडे (दोन अर्ज) व अलिशा अस्लम शेख अशा 16 महिला उमेदवारांनी 20 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातून संगमनेरची लढत नेमकी कशी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला असून शुक्रवारी माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र निवडणुकीच्या सुरुवातीलाच उमेदवारीवरुन महायुतीमधला बेबनाव समोर आल्याने त्याचे प्रतिबिंब निवडणूक निकालातून उमटण्याची शक्यता आहे.

Visits: 276 Today: 2 Total: 1880801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *