पत्रकार दातीर खून प्रकरणातील आरोपीस शिताफीने अटक महाराज असल्याची बतावणी करुन मंदिराच्या परिसरात वास्तव्य
नायक वृत्तसेवा, राहुरी
पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील आरोपी कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) याला पोलिसांनी शिताफीने अटक केली होती. मात्र, काही महिन्यांतच तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी तो काही काळ मध्य प्रदेशात जाऊन राहिला. पोलिस तेथे पोहचले. कुणकुण लागताच आरोपी मोरे पुन्हा राहुरीत आला. येथे एका मंदिराच्या परिसरात तो राहत होता. आपली मूळ ओळख लपविण्यासाठी त्याने महाराज असल्याची बतावणी करून तसा वेष धारण केला होता. अखेर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेच. त्याच्यासह त्याला मदत करणारेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
एप्रिलमध्ये राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी मोरे हा मुख्य सूत्रधार आहे. त्यावेळीही मोरे बराच काळ फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला आणि साथीदारांनाही अटक केली. त्यांच्याविरुद्ध दोषारोपत्रही न्यायालयात दाखल झाले. तेथे खटला सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. याकाळात आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, ऑगस्टमध्ये आरोपी मोरे याला करोनाची लागण झाली. त्यामुळे त्याला पोलीस बंदोबस्तात अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरोनातून बरा होत असतानाचा अन्य आजार उद्भवल्याने त्याला पुण्याला हलविण्यात येणार होते. 28 ऑगस्ट रोजी त्याला पुण्याला नेण्यासाठी अहमदनगरच्या डॉक्टरांनी शिफारस केली. त्यानुसार रुग्णवाहिकाही बोलाविण्यात आली. मात्र, मधल्या काळात आरोप मोरे याने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला आणि पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तेव्हापासून तब्बल पाच महिने पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सापडत नव्हता. आजारी असल्याने कुठल्या तरी रुग्णालयात उपचार घेईल, या शक्यतेमुळे पोलिसांनी त्या दिशेनेही तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना त्याच्या वास्तव्याबद्दल माहिती मिळाली. आरोपी मोरे मध्य प्रदेशात राहत असल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस तेथे गेले. मध्य प्रदेशातील बडवा जिल्ह्यात आरोपी लपला असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्याचेही खबरे होते. त्यामुळे पोलीस तेथे आल्याची माहिती त्याला मिळाली. तो तेथूनही पळाला. मात्र, त्याला मदत करणारे व आश्रय देणारे त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरु मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) आणि सतीश श्रीकांत हरिचंद्र (रा. धामोरी खुर्द, ता. राहुरी) पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर आरोपीचा शोध सुरूच होता. काही दिवसांनी आरोपी राहुरी तालुक्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुहा फाट्याजवळील मळगंगा देवीच्या मंदिर परिसरामध्ये वेशांतर करून आरोपी मोरे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे तो ठिकाण बदलून राहत होता. त्यामुळे पोलिसांनी त्या भागावर लक्ष केंद्रित केले. आरोपी मोरे महाराज असल्याचे सांगून तशी वेशभूषा करून राहत असल्याचे समजले. अखेर कटके यांच्या पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली.