निवडणुकीच्या धामधुमीत एक कोटींची रोकड पकडली! संगमनेरातील ‘लक्ष्यवेधी’ घटना; पोलिसांच्या तपासणीत आढळली रक्कम..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांची धामधूम सुरु असतानाच संगमनेरातून ‘लक्ष्यवेधी’ घटना समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुरुप कार्यरत असलेल्या पोलिसांच्या भरारी पथकाने एका स्वीफ्ट डिझायर कारमधून एक कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. पुण्याहून संगमनेरच्या दिशेने निघालेल्या या कारमधील दोघांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत सदरची रक्कम धाराशिवस्थित एका बांधकाम कंपनीची असल्याचे समोर आले आहे. याबाबत निवडणूक अधिकार्‍यांना कळवण्यात आले असून प्रकरणाची सत्यता पडताळली जात आहे. सध्या संगमनेरची निवडणूक रंगात येत असतानाच सदरची घटना समोर आल्याने शहरात उलटसुलट चर्चाही रंगल्या आहेत, मात्र या रकमेचा निवडणुकीशी संबंध नसल्याचे दिसून येत आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.15) दुपारी चारच्या सुमारास जुन्या महामार्गावरील खांडगावनजीकच्या तपासणी नाक्यावर घडली. रायतेवाडीकडून संगमनेरच्या दिशेने निघालेल्या एका स्वीफ्ट डिझायर या वाहनाची तपासणी केली असता त्यात इतर सामानासह एका बॅगमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या नोटांचा भरणा असलेली तब्बल एक कोटी रुपयांची रोकड सापडली.


सदरील रोकडबाबत विचारणा करता कारमधील दोघांना कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. मात्र त्यांनी सदरची रक्कम धाराशिव येथील अजमेरा कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीचे असून सध्या कंपनीकडून निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम सुरु असल्याने तेथील मजूरांच्या पगारासह वाहनांच्या डिझेलसाठी घेवून जात असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत संगमनेरच्या निवडणूक अधिकार्‍यांना कळविण्यात आले असून त्यांच्या पथकाकडून वाहनातील ‘त्या’ दोघांच्या वक्तव्याची सत्यता पडताळली जात आहे.


दुपारी घडलेली ही घटना वार्‍याच्या वेगाने संपूर्ण तालुक्यात पसरल्याने त्याला राजकीय रंगही चढला होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत या रकमेचा निवडणुकीशी संबंध नसल्याचे समोर आल्याने गेले दोनतास उठलेला अफवांचा धुरळा खाली बसू लागला आहे.

Visits: 32 Today: 1 Total: 1108046

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *