वृद्ध महिलेला शहरातील नेहरु उद्यानाजवळ आणून लुटले! योजनेतून पैसे मिळवून देण्याची लालच; बाभळेश्वरपासून 35 किलोमीटरचा पाठलाग..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगभरात रोज घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांचे मथळे ठळकपणे समोर येत असतानाही अनेकजण आजही अनोळखी इसमांच्या भूलथापांना बळी पडतात आणि स्वतः जवळील मौल्यवान ऐवज गमावतात. असाच प्रकार राहता येथून शासकीय कामानिमित्त संगमनेरच्या सेतू कार्यालयात आलेल्या 75 वर्षीय वृद्ध महिलेचा एका चोरट्याने राहत्यापासून सेतू कार्यालयापर्यंत पाठलाग केला. तेथे त्या वृद्धेला भूलथापा मारुन त्यांच्याकडील 50 हजार रुपयांचे दागिने लुटून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास गर्दीचे ठिकाण असलेल्या नेहरु उद्यानाजवळील कुदळ मिसळ सेंटर येथे सदरचा प्रकार घडला. याप्रकरणी वृद्धेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहता येथील पद्मा कांतीलाल चोरडिया (वय 75, रा.साकुरी, ता.राहता) ही वृद्ध महिला जुन्नर येथील आपल्या भावाकडे जाण्यासाठी बाभळेश्वर बसस्थानकातून पुण्याच्या बसमध्ये बसल्या. त्याचवेळी साधारणत: 30 ते 35 वयाचा तरुण सदरील महिलेच्या शेजारी येऊन बसला. सदरील वृद्धेची बहीण संगमनेर येथे राहत असल्याने त्या संगमनेमध्ये थांबून नंतर जुन्नरकडे जाणार होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या अंगावरील दागिने हेरुनच बाबळेश्वर बसस्थानकापासून त्यांच्या सोबत बसलेल्या चोरट्याने गोड बोलून ओळख वाढवली. त्यातून त्याने आपले नाव सय्यद असल्याचे सांगितले.  बोलताबोलता आजींनी आपली कौटुंबिक माहितीही त्याला सांगितली. 
त्यावरून तिच्या आजींच्या विजय नावाच्या मुलाशी आपली ओळख असल्याचे नाते ‘त्या’ भामट्याने जोडले आणि आजींना आपल्या जाळ्यात ओढले. यावेळी त्याने आपण संगमनेरच्या सेतू कार्यालयात काम करीत असल्याची बतावणी करुन तुम्हाला “संजय गांधी निराधार योजनेतून मासिक मानधन” सुरु करून देण्याचे आमिष दाखवले. आजींना मासिक मिळणाऱ्या पैशांचा मोह झाल्याने आणि त्यातच चोरट्याने मुलाचा मित्र अशी ओळख दिलेली असल्याने आजींचा ही त्याच्यावर विश्वास बसला. त्याचा फायदा घेत त्या भामट्याने आज सकाळी साडेनऊ वाजता संगमनेर बस स्थानकात उतरल्यानंतर त्या महिलेला रिक्षाने संगमनेर तहसील कार्यालयाजवळ आणले. तेथे ही योजना निराधार आणि गरीब लोकांसाठी आहे, तुम्ही अशाप्रकारे अंगावर दागिने घालून कार्यालयात आलात तर तुमचा अर्ज नामंजूर केला जाईल अशी भिती त्यांना घातली.
त्यामुळे आजींनी आपल्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी, बोटातील दोन ग्रॅमच्या अंगठ्या व कर्णफूले असा श दोन तोळे वजनाचा आणि पन्नास हजार रुपये किंमतीचा ऐवज आपल्या पाकिटात ठेवून ते पाकीट आपल्या बॅगेत ठेवले. तेथून त्या भामट्याने महिलेला नेहरु उद्यानाजवळील कुदळ मिसळ सेंटर येथे नेले. कार्यालयात बॅगा घेऊन जाता येणार नसल्याचे सांगितले बॅगा येथेच ठेवू असे सांगून महिलेकडील बॅग मिसळीच्या दुकानात ठेवले. त्याचवेळी त्या भामट्याने चालाखीने बॅगमधील मुद्देमाल ठेवलेले पाकीट लांबवले. 
तेथून ते चक्क तहसील कार्यालयाच्या म्हणजेच शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आले. तेथील पायऱ्यांजवळ आल्यानंतर आजींना येथेच बसा असे सांगून तहसीलच्या एका बाजूच्या वरती जावून दुसऱ्या बाजूने तो पसार झाला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तो न आल्याने चलबिचल झालेल्या त्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालयात जाऊन सय्यद नामक कोणी कर्मचारी आहे का याची विचारणा केली असता त्यांना अशी कोणीही कार्यरत नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी घाईघाईने पुन्हा कुदळ मिसळ सेंटर येथे जाऊन तेथे ठेवलेल्या आपली बॅग  उचकून पाहिली असता त्यात दागिने नसल्याचे दिसून आले. तेथेच त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी आपल्या बहिणीसह संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेची फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी बस स्थानकात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करण्याच्या अनेक घटना समोर येत असताना आता या घटनेतून थेट 35 किलोमीटर पाठलाग करून चोरी करण्याचा भलताच प्रकार समोर आला आहे. सदरील चोरटा बसस्थानकासह रिक्षा स्टॅन्ड आणि तहसील कार्यालयाच्या आवारातही वावरल्याने विविध बाजूचे सीसीटीव्ही फुटेज मिळणेही शक्य आहे, फक्त गरज आहे ती तपासी अधिकाऱ्याच्या योग्य भूमिकेची. या घटनेतून चोरट्यांचा नवा ‘फंडा’ही समोर आला असून प्रवासात दागिन्यांचे वहन टाळण्याचा प्रयत्न हाच यामागील उपाय दिसत आहे.
Visits: 35 Today: 1 Total: 117999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *