नावं जाहीर होत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली! गुलाबी थंडीत पालिका निवडणुकीची रंगत; सत्ताधारी गटाने घेतली प्रचारात आघाडी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पाचवा दिवस उजेडूनही अद्याप एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही. तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीत दोन्हीकडून इच्छुकांची संख्याही मोठी असल्याने एकाच्या नावाला पसंदी देत इतरांची समजूत घालताना पक्षश्रेष्ठींच्या अक्षरशः नाकीनऊ आले आहेत. त्यातून बंडखोरीची शक्यताही वाढल्याने सत्ताधारी गटासह विरोधकांनीही आपल्या उमेदवारांच्या नावांबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली आहे. त्यामुळे प्रभागनिहाय इच्छुकांची घालमेल वाढली असून ऐन गुलाबी थंडीत निवडणुकीची रंगतही वाढत आहे. एकीकडे प्रभागनिहाय उमेदवारांच्या नावांची प्रतिक्षा असताना दुसरीकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी घरोघरी जावून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात सातत्य ठेवल्याने सत्ताधारीगटाने प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या ‘जनतेचा अजेंडा’ या उपक्रमालाही संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.


अडथळ्यांची शर्यत ओलांडीत अखेर मुहूर्त लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर संगमनेरात मोठी चुरस निर्माण होवू पाहत आहे. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा सत्ताधारीगटाने पक्षीय चिन्हाऐवजी शहर विकास आघाडी निर्माण करुन त्यात शहरातील प्रभावी आणि कर्तृत्ववान उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सत्ताधारीगटाचे नेतृत्व करणार्‍या आमदार सत्यजीत तांबे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून प्रभागनिहाय प्रत्येक उंबर्‍याला भेट देत संगमनेरकरांचा पाठींबा मिळवण्यासह त्या-त्या भागातील लोकाभिमुख उमेदवारांचा शोधही घेतल्याने यावेळी सत्ताधारी गटाकडून नव्या-जुन्यांचा मेळ घालून जास्तीतजास्त तरुणांना संधी मिळणार आहे.


सत्ताधारीगटाने नगराध्यक्षपदासाठी मैथिली तांबे यांच्या नावाची चर्चा सुरु केली असून जवळजवळ याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी आमदार तांबे यांनी लोकमताचा कानोसा घेवून मनोमनी तयार केलेल्या प्रभागनिहाय उमेदवारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. प्रदीर्घ काळानंतर पालिकेच्या निवडणुका होत असल्याने यावेळी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूला निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची मोठी संख्या आहे. मात्र त्याचवेळी प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या विजयाचा दावाही करीत असल्याने एकाची निवड करुन इतरांची समजूत घालताना पक्षश्रेष्ठींच्या नाकीनऊ आले आहेत.


विरोधीगटात असलेल्या महायुतीचीही अशीच स्थिती असून नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्यांची मोठी संख्या पाहता अंतिम निर्णय लोणीच्या दिशेने ढकलण्यात आला आहे. वास्तविक महायुतीच्या निर्णयानुसार संगमनेरातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसह त्यांच्या नावाला जनतेची कितपत पसंदी आहे याबाबत सर्व्हे करण्यात आले होते. त्यातून प्रत्येक प्रभागातून चार प्रभावी उमेदवार निश्‍चित करण्यात आले असले तरीही प्रत्यक्ष निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांबाबत मात्र गुप्तता पाळली गेली आहे. त्यातून विरोधकांनाही बंडखोरीची भीती वाटत असल्याचे दिसत असून ऐनवेळी उमेदवारांची नावे जाहीर करण्याची व्यूहरचना आखली गेली आहे.


एकंदरीत मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या खूप मोठी असून त्यातील नेमक्या उमेदवाराचा शोध घेवून एका नावाला पसंदी देणं जिकरीचे बनले आहे. त्यातही उमेदवारी दाखल करण्यासाठी आता सोमवारचा (ता.17) एकमात्र दिवस शिल्लक राहिल्याने उद्या किंवा परवा दोन्हीकडील उमेदवारांच्या नावाची घोषणा होवू शकते.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टीपथात असूनही संगमनेरात अद्याप सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही कडून इच्छुक असलेल्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामागे यावेळी इच्छुकांची मोठी संख्या असल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. त्यातून एक नाव निश्‍चित करुन जाहीर केल्यास इतर इच्छुकांची नाराजी ओढावण्याची व त्यातून बंडखोरीची शक्यता असल्याने दोन्ही गटाकडून अतिशय सावध पावलं टाकली जात असून नगराध्यक्षांसह नगरसेवकपदाच्या अंतिम उमेदवारांची यादी ऐनवेळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Visits: 70 Today: 7 Total: 1104280

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *