कोपरगावच्या निवडणुकीत संगमनेरच्या विकासाचा ‘डंका’! त्यांना जमलं, तुम्हाला का नाही?; फ्लेक्सद्वारा विचारला जातोय सवाल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या राज्यात पालिका निवडणुकांचा धुरळा उडालेला असताना संगमनेरातही विरोधकांकडून चाळीस वर्षांच्या सत्तेचा हवाला देत शहर विकासावरुन सवाल विचारले जात आहेत. त्याचे ठणठणीत उत्तर चक्क कोपरगावमधून देण्यात आले असून तेथील विरोधकांच्या प्रचारात संगमनेरच्या विकासाचा डंका वाजत आहे. गोदाकाठावर वसलेल्या कोपरगावकरांचा पाण्याचा संघर्ष आजही गंभीर असल्याने यावेळच्या पालिका निवडणुकीत याच मुदद्यावरुन तेथील राजकारण तापले आहे. त्यासाठी तेथील विरोधकांकडून संगमनेरच्या विकासाचा संदर्भ दिला जात असून ‘जे संगमनेरकांना जमलं, ते तुम्हाला का नाही?’ असा सवाल विचारणारे फ्लेक्स कोपरगाव शहरातील रस्त्यांवर झळकू लागले आहेत. त्यावरुन आता स्थानिक सत्ताधार्यांनाही बळ मिळाले असून अवघा जिल्हा पाणीटंचाईच्या झळा सोशीत असताना संगमनेरकरांना अखंडीत होणारा पाण्याचा पुरवठा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे.

जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरपालिकांमध्ये समावेश असलेल्या संगमनेरलाही काही वर्षांपूर्वीपर्यंत पाणीटंचाईचा प्रचंड त्रास भोगावा लागत होता. शहरासाठी कोणतीही शाश्वत पाणीपुरवठा योजना नसल्याने नदीपात्रातून वाहणार्या आवर्तनाखेरीज शहरात नियमित पाणीपुरवठा करणं अशक्य होते. अशाकाळात संगमनेर मतदारसंघातून निवडून गेलेल्या बाळासाहेब थोरात यांनी ‘पाणीटंचाई मुक्त शहरा’चे स्वप्नं मनात बाळगून पाण्याला ‘मिशन’ समजून कामाला सुरुवात केली. या काळात 1991 साली पालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ.सुधीर तांबे यांनी संगमनेरकरांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचा पहिला प्रयोग म्हणून शहरवासियांच्या गावीही नसलेल्या ‘भूमिगत बंधार्या’ची अभिनव संकल्पना मांडून त्यावर युद्धपातळीने कामही सुरु केले.

बंधारा आणि तो देखील भूमिगत ही कल्पनाही त्यावेळी गैरच असल्याने डॉ.तांबे यांचा प्रयोग पाहण्यासाठी त्यावेळी नदीकाठावर लोकांची अक्षरशः झुंबड उडायची. त्याकाळी फारशी संसाधने, मशिनरी उपलब्ध नसल्याने मनुष्यबळावा वापर करुन महादेवघाटाच्या परिसरात नदीपात्रात प्रवाहाला आडवा चर खोदण्यात आला. त्यात पोयट्याची भर घालून रस्त्याच्या कामाला वापरतात त्या रोलरच्या साहाय्याने तो ठासून दाबण्यात आला. त्याचा परिणाम धरणाच्या आवर्तनानंतर लागलीच दोन-तीन दिवसांत जाणवणारी पाणीटंचाई लांबली व संगमनेरकरांचा त्रास बर्याचअंशी कमी झाला. मात्र वाढत्या शहरासह पाण्याची वाढत जाणारी मागणी आणि वापर यामुळे हा बंधाराही तोकडा भासू लागला.

या दरम्यान सत्तांतर घडून राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांना पहिल्यांदाच स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले गेले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष आग्रह करुन पाटबंधारे खाते मागून घेतले आणि त्या माध्यमातून आपल्या मनातील संकल्पाची पूर्ती करण्यास सुरुवात केली. ब्रिटीशकाळातच भंडारदर्यातील संपूर्ण पाणीवाटप झालेले असल्याने आणि त्यातील बहुतेक पाण्यावर पूर्वेकडील तालुक्यांचा अधिकार प्रस्थापित असल्याने संगमनेरकरांना पाणीटंचाईपासून मुक्त करायचे असेल तर, निळवंडे धरणाशिवाय पर्याय नसल्याचे ताडून मंत्री थोरात यांनी आपली संपूर्ण शक्ति निळवंडेच्या पूर्ततेसाठी लावली.

पाटबंधार्याचे राज्यमंत्रीच झपाटल्यागत कामाला लागल्याने निळवंडेच्या कामाला वेग आला. या दरम्यान 50 वर्षांची दूरदृष्टी ठेवून मंत्री थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी असलेल्या मैत्रीचा संगमनेरकरांच्या त्रास मुक्तीसाठी वापर करुन निळवंडे धरणातून थेट संगमनेरला पिण्याच्या पाण्याचा पाईप टाकण्याची योजनाही मंजूर करवून घेतली. त्यासाठी आवश्यक निधी मिळवून धरणाच्या भिंतीत संगमनेरच्या पाणीयोजनेचा पाईपही टाकला गेला. विशेष म्हणजे संगमनेरच्या ‘शाश्वत’ योजनेचा हा ‘उद्भव’ धरणाच्या भिंतीत अशा जागी बसवण्यात आला की, धरणाने तळ गाठला तरीही योजनेचा पाईप तोंड वर काढणार नाही. त्यातून संगमनेरच्या पाणीप्रश्नाचा कायमस्वरुपी उपाय राबवला गेला.

गेल्या दीड दशकापासून संगमनेरकरांना याच पाईपलाईनमधून पूर्णदाबाने पाण्याचा पुरवठा केला जात असून त्यासाठी शहर व उपनगरांच्या विविधभागात पालिकेने सात जलकुंभातून एककोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली आहे. नव्याने विस्तारलेल्या जलवाहिन्यांद्वारा शहरातील घराघरात थेट निळवंडेचे पाणी पोहोचले असून अनेकभागात विद्युत उपकरणांशिवाय दुसर्या मजल्यापर्यंत सहज पाणी जाते अशीही उदाहरणे आहेत. शिवाय गेल्या सरकारमध्ये महसूलमंत्रीपदी असताना त्यांनी वाढलेल्या शहरातील नागरिकांना अविरत स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा समावेश असलेला 23 कोटी रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्पही मंजूर करवून घेतला, त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.

काही दशकांपूर्वीपर्यंत ज्या संगमनेर शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा केवळ नदीपात्रातील वाहत्या पाण्यावरच अवलंबून होता. त्या संगमनेर शहरात आज नियमित आणि पूर्णदाबाने पाणीपुरवठा होतो. गेल्या दीड दशकांत तेथील नागरिक पाणीटंचाई हा शब्दही विसरले. त्यांच्या लोकप्रतिनिधींनी ध्येयाने काम केले आणि त्यांच्या नागरिकांना त्रासमुक्त केले. मग त्यांना जे जमले ते तुम्हाला का नाही? असा सवाल कोपरगावमधून विचारला जात आहे. संगमनेरसारखीच स्थिती कोपरगावचीही आहे. तेथील संपूर्ण पाणीपुरवठा गोदेच्या पाण्यावर अवलंबून आहे. कोपरगावातही दोन परिवार वर्षोनुवर्ष पाणीप्रश्नावरच निवडणुका लढवत आहेत. पण प्रत्यक्षात त्यांना संगमनेरच्या नेतृत्वाप्रमाणे ही समस्या सोडवण्याची प्रामाणिक इच्छा नाही अशी तेथील नागरिकांची भावना झाली असून त्यातून त्यांना संगमनेरच्या विकासाचा आरसा दाखवला जात आहे.

हाच धागा पकडून तेथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शहरात जागोजागी फ्लेक्स लावून त्यातून ‘संगमनेरला दिवसातून दोनवेळा पाणी येते. जे संगमनेरला जमले, ते कोपरगावला का नाही?’ असा सवाल तेथील सत्ताधार्यांना विचारला आहे. पालिका निवडणुकीत कोपरगावमधील प्रचारात चक्क संगमनेरच्या विकासाचे मुद्दे समोर केले जावू लागल्याने कोपरगावचे फ्लेक्स जिल्ह्यात लक्ष्यवेधी ठरत आहेत.

उमेदवार निश्चितीच्या कारणाने संगमनेरच्या निवडणुकीत अद्याप रंगत नसली तरीही सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणार्या आमदार सत्यजीत तांबे यांनी मतदारांच्या गाठीभेटींना प्राधान्य देत शहरातील प्रत्येक उंबरा गाठला आहे. त्यांच्या या प्रयोगातून शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्यांनी मांडलेली ‘जनतेचा जाहीरनामा’ ही संकल्पनाही तुफान गाजत आहे. अशातच आता कोपरगावच्या प्रचारात संगमनेरच्या विकासाचा डंका वाजू लागल्याने संगमनेरच्या सत्ताधारीगटाच्या मनसुब्यांसह त्यांना जनतेचा पाठींबा वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडूनही हा मुद्दा प्रचारात आणला गेला आहे.

