चोरीचा प्रयत्न करणार्‍या भामट्याची यथेच्छ धुलाई राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन केला गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील मठगल्ली परिसरात गुरुवारी (ता.28) मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करत असताना सतीश धोत्रे या भामट्याला रंगेहाथ पकडण्यात आले. परिसरातील नागरिकांनी त्याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

ईश्वर गोपीनाथ जाधव (रा. मठगल्ली, कैकाडीवाडा, रा. राहुरी) हा तरूण गुरुवारी नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेला. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्याला कशाचा तरी आवाज आला, त्यानंतर तो उठून घराबाहेर आला. त्यावेळी त्याच्याशेजारी त्याचा मामा बाळासाहेब सूर्यभान गायकवाड यांच्या घराचा दरवाजा एक भामटा कटावणीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करत होता.

ईश्वर जाधव याने त्या भामट्याला चोरीचा प्रयत्न करत असताना रंगेहाथ पकडून आरडाओरडा केला. तेव्हा परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी त्या भामट्याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या भामट्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव व पत्ता सांगितला. या प्रकरणी ईश्वर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सतीश भगवान धोत्रे (रा. लोहार गल्ली, राहुरी) याच्या ि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक शहामद शेख हे करीत आहेत. यापूर्वी या परिसरातून गॅस टाक्या, मोबाईल, सायकल तसेच लोखंडी सामान चोरी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी या भामट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *