कांद्याचे दर कोलमडल्याने राहुरीत स्वाभिमानीचा रास्ता रोको तीस रुपये प्रतिकिलो भाव देण्याची शेतकर्यांची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
सध्याची परिस्थिती पाहाता कांद्याचे भाव कोलमडून गेले आहेत. कांदा उत्पादनावरील झालेला खर्च फिटणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने शेतकर्यांच्या कांद्याला किमान तीस रुपये प्रतिकिलो भाव द्यावा. तसेच निर्यातीला प्रतिक्विंटल 500 रुपये भाव द्यावा. अन्यथा भविष्यामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदोलनाचे हत्यार उचलले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला.
मंगळवारी (ता.16) कांद्याच्या भाववाढीबाबत नगर-मनमाड मार्गावर बाजार समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोरे म्हणाले, खर्या अर्थाने देशाला अजून कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. शेतकर्याला त्याच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ अजून शेतकरी पारतंत्र्यात आहे. प्रत्येकाला ज्याचा-त्याचा मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे. मग शेतकर्याला त्याच्या मालाचा हमीभाव ठरविण्याचा अधिकार का नाही? शेतकरी मोठी आशा ठेवून सावकार, बँका, पतसंस्थेकडून कर्ज घेऊन शेत पिकवितो. परंतु त्याच्या हाती काही मिळत नाही. त्यातून तो आर्थिक कर्जाच्या विळख्यात सापडत आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे.
शेतकर्यांचे आर्थिक बजेट दिवसेंदिवस कोलमडले जात आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शेतकर्याच्या मालाला अपेक्षित प्रमाणात हमीभाव मिळत नाही. तर दुसरीकडे औषध, मजुरी, मशागत व खतांच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहे. महागाईचा दर दहा ते वीस पटीने वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी शेती पिकवायची कशी? हा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. प्रकाश देठे म्हणाले, गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून कांद्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. कांद्याच्या भावासंदर्भात शेतकर्यांना कायमच रस्त्यावर उतरावे लागते. राज्यकर्त्यांना यात कुठल्याच प्रकारचे घेणे देणे नाही. ईडी, इन्कम भीतीने शेतकर्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. राज्य व केंद्र सरकारने कांद्यासंदर्भात विचार केला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन हाती घेतले जाईल. यामुळे सरकारला पळताभुई थोडी होईल, अशी संतप्त भावना देठे यांनी व्यक्त केली. यावेळी बाळासाहेब जाधव, सुनील आढाव, पिंटूनाना साळवे, कमलाकर इंगळे, सचिन म्हसे, किशोर वराळे, नीलेश लांबे, महेश करपे, गुलाबराव निमसे, राहुल करपे, विलास गागरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.