नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत संगमनेरात प्रचंड उत्सुकता! दोन्ही बाजूचे एकमेकांकडे लक्ष; उमेदवाराबाबत मात्र प्रचंड गोपनीयता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाबाबत पत्रकार परिषद होवूनही संगमनेरातील उमेदवारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. गेल्या वर्षभरात घडलेल्या विविध राजकीय घडामोडीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही मोठे महत्व प्राप्त झाले असून मागील कालावधीतील राजकीय वक्तव्य पाहता महापालिका वगळता सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांचा सामना करतील असा अंदाज आहे. त्या अनुषंगाने संगमनेरातील वातावरणही तापले असून यावेळी सत्ताधारी गटाकडून शहर विकास आघाडीचे सूत्र राबवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीनेही आपले पत्ते दाबून ठेवल्याने सर्वसामान्य मतदारांची उत्कंठा ताणली गेली असून दोन्ही बाजूने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसह नगरसेवकपदाचे तिकिटं मिळवण्यात कोण यशस्वी होणार यावरुन कट्ट्याकट्ट्यावरील चर्चा रंगल्या आहेत.

जवळपास नऊ वर्षानंतर होत असलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीची सर्वसूत्र सत्ताधारीगटाने आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडे सोपवली आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी गेल्या मोठ्या कालावधीपासून शहरातील सर्व घटकांशी संवाद साधून निवडणुकीची तयारीही सुरु केली. या दरम्यान पदवीधर मतदारसंघात पक्षादेश नाकारुन अपक्ष उमेदवारी केल्याने काँग्रेसने त्यांच्यासह माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केले. निवडणुकीनंतर भाजपच्या पाठबळावरील विजय आणि आजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतल्या अनेक मंत्र्यांशी जवळीक या कारणाने पक्षाने त्यांचे निलंबन मागे घेण्याबाबत कधीही विचार केला नाही. त्यामुळे यावेळची पालिका निवडणूक सत्ताधारीगट पक्षचिन्हावर लढवणार की स्वतंत्रपणे आघाडी निर्माण करुन याबाबत साशंकता निर्माण झाली होती. दैनिक नायकने याबाबतचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे समोर येवून संगमनेरात यावेळी सत्ताधारी गटाकडून शहर विकास आघाडीची मोट बांधली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसह भाजपमधील अनेक मोठ्या नेत्यांनी महापालिका वगळता स्थानिक पातळीवर महायुतीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्याबाबत वक्तव्य केल्याने राज्यात 2016 सालची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. मात्र गेल्या आठवड्यात माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बैठकांवरुन केलेल्या रोखठोक वक्तव्यानंतर संगमनेरात भाजप-सेना व मित्रपक्ष एकत्र लढतील असे संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी नगराध्यक्षपदाचा उमेदवारही भाजपचा असेल असे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षात इच्छुक असलेले काही चेहरे अचानक चर्चेत येवून वारंवार दृष्टीसही पडू लागले आहेत. त्यात प्रामुख्याने भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजणे यांचे नाव आघाडीवर असून त्या पाठोपाठ रेखा गलांडे, स्मिता गुणे, सुषमा तवरेज अशा नावांचीही चर्चा सुरु आहे.

कारखाना निवडणुकीपासून नाराज असलेले माजी उपनगराध्यक्ष धनंजय डाकेही वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका मालती डाके यांचेही नाव चर्चेत आले आहे. मात्र त्यांच्याकडून वरील चर्चांना अथवा घरातील उमेदवारीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे संगमनेरात आकाराला येत असलेल्या सत्ताधारी शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत मोठी उत्कंठा ताणली गेली असून आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यासोबतच काही माजी नगरसेविकांच्या नावाचा उल्लेखही केला जात आहे, मात्र त्याबाबत कोणतीही शाश्वत माहिती उपलब्ध झालेली नाही.

एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही संगमनेरच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले नसून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे पाहून निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. अर्थात शहर विकास आघाडीचा पाया घालू पाहणार्या आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह महायुतीकडून माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांनी निवडणुकीची तयारी आणि संभाव्य उमेदवारांच्या नावाची चाचपणी मात्र सुरु केली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने एकाचवेळी उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासूनच उजव्या बाजूला झुकत असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारीगट निवडणुकीची तयारी करीत असल्याने संगमनेरात यावेळी ‘शहर विकास आघाडी’ जन्माला येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी सत्ताधारीगटाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याबाबतची उत्कंठाही ताणली गेली असून आमदार तांबे यांच्या पत्नी मैथिली यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचवेळी महायुतीकडूनही उमेदवारीबाबत काही नावे चर्चेत असून त्यात भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजणे यांच्यासह रेखा गलांडे, स्मिता गुणे, सुषमा तवरेज अशी काही नावे सतत चर्चेत येत आहेत. यातील कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते यासाठी मात्र काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

