पालिका निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीची बांधणी! आमदार सत्यजीत तांबे यांच्या भेटीगाठी; सर्वसमावेशक निष्कलंक उमेदवारांचा शोध..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोहींकडून रणशंख फूंकले गेले असून वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील व्यापार्यांसह सर्वसामान्य संगमनेरकरांच्या भेटीगाठी सुरु केल्याने यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे सेनापत्य त्यांच्याकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी गेल्या दोनवर्षांपासून काँग्रेसमधून निलंबित असलेले आमदार तांबे पक्षीय चिन्हावरील निवडणुकीचा पुरस्कार करतील की आघाडीची संकल्पना मांडतील असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र तांबे यांच्या भेटीतून सर्वपक्षीय निष्कलंक उमेदवारांचाही शोध सुरु असल्याने संगमनेरात यावेळी ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘महायुती’ अशी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. आमदार तांबे यांनी पुढील पाच वर्षांच्या विकासाचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवून त्याला पूरक सहकार्यांचा शोध घेण्यासाठीच ‘भेटीगाठी’ सुरु केल्याचे त्यांच्या वर्तुळातून बोलले जात असल्याने आघाडीच्या चर्चांनाही बळ मिळाले आहे.

तब्बल नऊ वर्षांनंतर संगमनेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दृष्टीस येवू लागली आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील 248 नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 25 ते 30 दिवसांच्या कालावधीत एकाच टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतची कल्पना असल्याने
प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर स्थानिक संस्थांच्या निवडणूका एकत्रित लढवण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याबाबतचे संकेत महायुतीकडून वेळोवेळी समोर आले आहेत. तर, काँग्रेसकडूनही महाविकास आघाडीबाबत फारशी उत्सुकता दाखवली गेलेली नाही. अशातच ठाकरे भावंडांच्या मनोमिलनाने मुंबईसह राज्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता असल्याने ज्येष्ठनेते शरद पवार यांनीही राजकीय गुळणी धरली आहे.

राज्याच्या पटलावरील नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत झालेली वक्तव्य आणि त्यातून मिळालेले संकेत पाहता 2016 सालच्या निवडणुकांप्रमाणेच यावेळीही सर्व राजकीय पक्ष आपापले राजकीय बळ आजमावणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रामीणभागात त्याचा मोठा परिणाम दिसण्याची शक्यता असून नऊ वर्षांपूर्वी संगमनेरातही महायुतीच्या भाजप-सेनेसह आघाडीच्या काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. यावेळीही तशीच स्थिती असताना पदवीधरच्या
निवडणुकीत बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवणार्या तांबे पिता-पुत्रांवर झालेली निलंबनाची कारवाई देखील कायम आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजकीय मंच वगळता आमदार सत्यजीत तांबे काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसून आलेले नाहीत. दरम्यानच्या काळात मात्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारमधील अन्य मंत्र्यांकडून विविध कामे करवून घेताना मोठा निधीही आणल्याने त्यांचा राजकीय विचार झुकत असल्याचेही संकेत मिळत होते.

त्यातच आता संगमनेर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारीगटाने आपले सेनापत्य त्यांच्याकडेच सोपवल्याने त्यांनी यंदा पक्षीय मर्यादा ओलांडून शहर विकासाचे ध्येय गाठण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने गेल्या दोन-तीन वर्षात
जगातील विकसित शहरांच्या संकल्पना साकारणार्या विभूतींच्या चरित्रांचा अभ्यास करुन त्यांनी संगमनेर शहराच्या विकासाचे मॉडेल तयार केले आहे. पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने त्यावर काम करुन ऐतिहासिक शहराचे बिरुद मिरवणार्या संगमनेर शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा त्यांचा मानस आहे. हे दिव्य पार पाडण्यासाठी त्यांनी उद्योगपती स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांनी नव्वदच्या दशकात मांडलेला ‘शहर विकास आघाडी’चा विचार पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी दूरदृष्टी असलेल्या चांगल्या सहकार्यांची साथ आवश्यक असल्याने आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘शहर विकास आघाडी’ची बांधणी करण्यासाठी संगमनेरकरांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्यासाठी पूर्वी शहराच्या जडणघडणीत योगदान देणार्या अठरापगड लोकांसह, विविध क्षेत्रात लौकीकप्राप्त प्रतिष्ठीत आणि प्रभावी नागरिकांना शहर विकासाच्या प्रयत्नात सहभागी करुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यंदाची निवडणूक राजकारण विरहित शहराचा कालबद्ध विकास
डोळ्यासमोर ठेवून लढवण्याचा प्रामाणिक मानस असल्याने शहरातील सर्वपक्षीय चांगल्या उमेदवारांना विकास आघाडीत स्थान देण्याचा प्रयत्न असल्याचे सत्ताधारी गोटाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे यंदाची पालिका निवडणूक अधिक रंगतदार झाली असून ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘महायुती’ की स्वतंत्र याबाबतची उत्कंठा ताणली जाणार हे मात्र निश्चित आहे.

कोणत्याही क्षणी राज्यातील 248 नगरपालिकांच्या निवडणुकांची घेाषणा होण्याची शक्यता आहे. अशावेळी संगमनेरातील राजकीय हालचालींना मात्र वेगळीच गती आली असून यावेळी सत्ताधारी गटाकडून उद्योगपती स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांनी साडेतीन दशकांपूर्वी मांडलेली ‘शहर विकास आघाडी’ची संकल्पना समोर आणली
जाण्याची शक्यता आहे. या संकल्पनेनुसार आपले शहर, आपली संस्था, आपल्यासाठी आपणच केलेला विकास या विचाराने पक्षविरहित समाजातील सर्वस्तरातील प्रभावी व्यक्तिंना एकत्र करुन केवळ ‘विकास’ डोळ्यासमोर ठेवून ध्येयाने पाच वर्ष काम करणे असा होतो , त्यानुसार पुढील पाचवर्ष काम करण्याचा आपला मानस असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून सांगितले जात आहे.

