कोपरगावात चोरट्याने एकाच रात्री पाच दुकाने फोडली…! 52 हजार 500 रुपयांची रोकड लांबविली; चोरटा सीसीटीव्हीत कैद

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मागील सहा महिन्यांपासून येवला रस्ता परिसरातील अनेक दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. विशेष म्हणजे चोरटा दुकानातील कोणतीही वस्तू न चोरता केवळ रोकड लांबवत आहे. मंगळवारी (ता.2) चोरट्याने पाच दुकाने फोडून 52 हजार 500 रुपयांची रोकड लांबविली आहे. यामुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांत देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, येवला रस्त्यावरील मनोज जोशी यांच्या साडी दुकानाच्या छताचा पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. उचकापाचक करून गल्ल्यातील 20 हजार रुपयांची रोकड व एक चांदीचे नाणे असा ऐवज लांबविला. समर्थ इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून तेथूनही 20 हजार रुपये लंपास केले. शेजारील चंद्रहास पैठणी दुकानाचे छत कापून 10 हजार 500 रुपये चोरले. विजय प्रकाश पाखरे यांचे दुचाकी व साईकमल फर्निचर हे दालन फोडून सामानाची उचकापाचक केली. मात्र, तेथे चोरट्याच्या हाती काही लागले नाही.

चोरट्याचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. यापूर्वीही दुचाकी दालन व विजय ट्रेडर्स हे किरणा मालाचे दुकान सलग तीन वेळा फोडून रोकड लंपास केली होती. त्या परिसरातील गॅरेज, टपर्‍या फोडणे चोरांसाठी हातचा मळ झाला आहे. प्रत्येक दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा चोरटा दिसत असूनही त्याच्यापर्यंत पोलीस अद्यापही पोहोचू शकले नाहीत. यामुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Visits: 145 Today: 1 Total: 1956071

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *