गोवंशाचे मांस घेवून निघालेला टेम्पो पकडला! शहर पोलिसांच्या कारवाईत एक हजार किलो गोवंशाचे मांस हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलीस दलातील फेरबदलांमुळे जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघालेले असताना या गोंधळाचा फायदा घेत अवैध व्यवसायिक संधी साधून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार रविवारी (ता.1) रात्री समोर आला असून शहर पोलिसांनी गोवंश जनावरांची कत्तल करुन अवैधमार्गे वाहतूक करणारा टेम्पो पकडला असून मुंबईतील दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक हजार किलो गोवंशाच्या मांसासह 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता.1) मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांमधून गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल करुन एका टेम्पोतून त्यांचे मांस मुंबईकडे नेले जात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावरील सायखिंडी फाटा येथे सापळा लावून संशयित वाहन पकडले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात एक हजार किलो गोवंशाचे मांस असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी टेम्पोसह मांस ताब्यात घेत दोघांना अटक केली.

या प्रकरणी पो.शि.धनंजय महाले यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे कलम 5(क), 9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन संशयित आरोपी वाहनचालक शहनवाज मोहम्मद हुसेन (वय 20) व इसतीयक अहमद कुरेशी (वय 25, दोघेही रा.कुर्ला, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोवंशाचे मांस वाहतूक करणारा 3 लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो (क्र.एम.एच.03/सी.व्ही.7922) व 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे एक हजार किलो गोवंशाचे मांस असा एकूण 4 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सध्या जिल्ह्यातील पोलीस दलात बदल्याचे वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणचे अधिकारी बदलून गेले आहेत तर अनेक ठिकाणी अद्यापही नूतन अधिकारी दाखल झालेले नाहीत. संगमनेर शहर व तालुक्यातील अन्य तिनही पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना अद्यापही बदली आदेशाची प्रतिक्षा असल्याने मिळालेल्या अतिरीक्त वेळेत त्यांच्याकडून ऐच्छिक पोलीस ठाणी मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नेमक्या याच संधीचा लाभ घेत शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायिक आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत. त्यातूनच शेकडो कारवायांनंतरही अबाधित असलेले शहरातील कत्तलखानेही अविरतपणे सुरुच असून रविवारी सायखिंडी फाट्यावर त्याची झलक बघायला मिळाली.

रविवारी रात्री शहर पोलिसांनी केलेल्या कारवाई बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या माहितीवरुन केली होती. विशेष म्हणजे शहर पोलिसांनी आजवर केलेल्या बहुतेक कारवायांची माहिती बजरंग दलाकडूनच दिली गेली होते असे समजते. रविवारच्या कारवाईसाठीही दिलेल्या माहितीनुसार सदर वाहनात तीन टनापेक्षा अधिक गोवंशाचे मांस होते असा दावा बजरंग दलाने केला आहे, मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ते एकच टन दाखविले गेल्याने व बजरंग दलाने तत्पूर्वीच मध्यरात्री तीन टन गोवंश मांसावर कारवाई झाल्याचे वृत्त ‘व्हायरल‘ केल्याने पोलिसांनी दाखल केलेले एक टन बरोबर की बजरंग दल म्हणतंय ते ‘तीन’ टन बरोबर असा काहीसा संभ्रमही निर्माण झाला आहे.

