साईबाबा संस्थानने कर्मचार्यांचे थकीत वेतन तात्काळ द्यावे ः गोंदकर
साईबाबा संस्थानने कर्मचार्यांचे थकीत वेतन तात्काळ द्यावे ः गोंदकर
नायक वृत्तसेवा, शिर्डी
अवघ्या पंधरा दिवसांवर दीपावली सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानने 2700 कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे थकीत वेतन देण्याबाबत पाच दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा 6 नोव्हेंबरपासून भाजपतर्फे साईबाबा मंदिरासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिला.
भाजप पदाधिकाम्यांच्या शिष्टमंडळाने साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. अशोक पवार, ज्ञानेश्वर गोंदकर, सचिन शिंदे, किरण बोर्हाडे व योगेश गोंदकर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गोंदकर म्हणाले, अकरा महिन्यांच्या करारावर कंत्राटी पद्धतीने सेवेत सामावून घेतलेल्या 598 कर्मचार्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले आहे, तर 2700 कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. विशेष म्हणजे त्यात 180 कोरोनायोद्धे आहेत. जोखमीचे काम करूनही त्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही. दीपावली अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरी साईसंस्थान कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही. या कंत्राटी कर्मचार्यांची चाळीस टक्के वेतनवाढ मागे घेण्यात आली. पूर्वलक्षी प्रभावाने ती पुन्हा लागू करावी. या कर्मचार्यांनी आजवर आंदोलने केली. साईसंस्थानच्या अधिकार्यांना निवेदने दिली, तरीही त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला नाईलाजाने याप्रश्नी आंदोलन हाती घेण्याची वेळ आली आहे.