कमालपूर येथील रस्ता पुराच्या पाण्यात गेला वाहून बंधार्‍यावरून नागरिकांचा रोज होतोय जीवघेणा प्रवास

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुका व मराठवाड्याला जोडणारा तालुक्यातील गोदावरी नदीवरील कमालपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावरील रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. यामुळे मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यातील दळणवळण ठप्प झाले आहे. दैनंदिन कामकाजासाठी श्रीरामपूर तालुक्यात येणार्‍या नागरिकांना सध्या मोठी कसरत करुन बंधार्‍यावरून प्रवास करावा लागत आहे.

मराठवाड्याला जोडणारा कमालपूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावरील रस्ता गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला आहे. मराठवाड्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यातील गोदाकाठच्या पैलतिरावरील बहुतांश गावांचे दैनिक दळणवळण श्रीरामपूर तालुक्याशी जोडलेले आहे. किराणा, कपडे, आठवडे बाजार, दूध डेअरी, भुसार व कांदा बाजार या सर्वच बाबतीत या नागरिकांचे तालुक्यात मोठे दळणवळण आहे. बंधार्‍यावरील रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेल्यानेे दळणवळण ठप्प झाले असून मूलभूत गरजांसाठी नागरिकांना या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

वैजापूर तालुक्यातील शनि देवगाव, चेंडूफळ, वाहेगाव, मांजरी आदी गावांतील नागरिकांचे श्रीरामपूर तालुक्यात शेती निगडित दळणवळण आहे. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात रस्ताच वाहून गेला आहे. बंंधार्‍यावरून वाहनाने तर सोडाच परंतु पायी चालणेही जिकरीचे झाले आहे. त्यामुळे वैजापूर, गंगापूर तालुक्याचा श्रीरामपूर तालुक्याशी संपर्क तुटला आहे. परिणामी महिला वर्गांना आठवडे बाजार, शेतकर्‍यांना कांदा विक्री, दूध व्यवसाय विक्रीस अडचणी निर्माण झाल्या असून आर्थिक फटका बसत आहे. आजारी रुग्णांबाबतही मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे हा वर्दळीचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा, अशी मागणी या परीसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

आम्हांला दळणवळणासाठी वैजापूर, गंगापूर व औरंगाबाद लांबचा पल्ला ठरत असल्याने आम्ही श्रीरामपूर तालुक्याला पसंती देत असतो. मात्र दोन तालुक्याला जोडणारा रस्ताच वाहून गेल्यामुळे आमचे अतोनात हाल होत आहेत. दोन्ही तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काम तातडीने करून देऊन आमच्या समस्या सोडवाव्यात.
– भारत पवार (प्रगतिशील शेतकरी, चेंडूफळ)

Visits: 225 Today: 4 Total: 1101168

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *