सार्वजनिक ठिकाणांवरील अस्वच्छता; विकृती की षडयंत्र? थेट नदीपात्रासह आता रस्तेही लक्ष्य; प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही वर्षात सार्वजनिक ठिकाणांचा गैरकृत्यांसह अनावश्यक घाणीची विल्हेवाट लावण्यासाठी वापर करणारी विकृती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. शहरालगतच्या विशिष्ट आडवाटेला लक्ष्य करुन शहरातील पशूंच्या कत्तलखान्यातील टाकावू अवशेषांसह संपूर्ण घाण गुपचूप टाकली जात असून त्यातून परिसरात दुर्गंधीसह श्वानांच्या टोळ्याही निर्माण झाल्या आहेत. काही विकृतांकडून जाणीवपूर्वक अशा गोष्टी केल्या जात असल्याचा संशय असून यापूर्वी अकोले रस्त्यावरील थेट म्हाळुंगीनदीच्या पात्रासह जाजू पंपामागील कोपर्याला काहींनी लक्ष्य केले होते. तसाच प्रकार आता चंद्रशेखर चौकातून संगमनेर खुर्दच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरही घडवला जावू लागल्याने त्यामागे षडयंत्राचा वास येवू लागला आहे. या रस्त्याचा वापर शेकडों वैद्यकिय शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींसह शांतीघाटावर विधीसाठी येणार्यांकडून होतो. कोपर्यावरील गाळपेरात पालिकेकडून झालेले मियावाकी पद्धतीचे वृक्षारोपण आणि नव्याने झालेले डांबरीकरण यामुळे हा वर्दळीचा रस्ता लौकीकास येत असतानाच त्याचा वापर करणार्यांना नाक मुरडायला लावणारा हा प्रकार संशयास्पद असून प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. हा प्रकार विकृतीच्या नावाखाली षडयंत्राचा भाग म्हणून तर राबवला जात नसावा असाही संशय असून या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा वर्तवली जात आहे.

संगमनेर शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच नागरिकांच्या मुलभूत गरजा पुरवणार्या ठिकाणांची संख्याही वाढत गेली आहे. त्यात समाजातील मोठा वर्ग मांसाहारी असल्याने पशूंच्या मटनासह गावठी आणि बॉयलर कोंबड्यांचे चिकन मिळणारी असंख्य दुकानेही शहराच्या विविध भागात आहे. खाद्य म्हणून मान्यता असलेल्या पशूंना दुकानातच आडोशाला कापले जात असल्याने त्यातून बाजूला पडणारे अनावश्यक अवशेष सायंकाळी एकत्रित करुन त्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्याबाबतचे नियम आहेत. संगमनेर नगरपालिकेच्या घंटागाडीकडून तशी सुविधाही पुरविली जाते. शहरातील अनेकजण त्याचे पालनही करतात. मात्र अलिकडच्या काळात काही विकृतांना शहरातील आल्हाददायक आणि स्वच्छ वातावरण सहन होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वारंवार त्यांच्याकडून जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणांवर प्रदूषण केले जात असून त्यातून सामाजिक आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात येत असल्याने संशय निर्माण झाला आहे.

यापूर्वी अकोले नाक्यावरील म्हाळुंगीच्या पात्राला लक्ष्य करीत शहरातील काही खाटीकांनी संपूर्ण नदीपात्राचा परिसरच प्रदूषीत करण्याची पद्धतशीर मोहीम आरंभली आहे. त्याचा पुढील टप्पा म्हणून जाजू पंपापासून साईनगरकडे जाणार्या रस्त्यावरील पहिल्याच कोपर्यात अशाप्रकारचे टाकावू अवशेष टाकले जातात. त्यामुळे या संपूर्ण परिसरातून प्रवास करताना अक्षरशः नाक मुरडूनच जावे लागते. तोंडाला रुमाल बांधून मनात षडयंत्राची आग घेवून काही विकृत रात्रीच्या अंधारात गुपचूप मोपेडवर येतात आणि पुढील बाजूस बांधून आणलेली घाणीची पिशवी टाकून तसेच पुढे पसार होतात. नियमित चालणार्या या प्रकारातून अकोले नाक्याच्या मुख्य चौकासह पंपाशेजारुन जाणार्या रस्त्यावरील थेट स्वामीसमर्थ मंदिरापर्यंत दुर्गंधी दाटलेली असते. अशा घाणीवर साम्राज्य गाजवणार्या भटक्या श्वानांनी आपल्या टोळ्याही निर्माण केल्या असून त्यांच्याकडून काही पादचारी व लहान मुलांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

जाणीवपूर्वक वर्दळीचे रस्ते हेरुन अशाप्रकारचे कृत्य सुरु असल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी जाजू पंपापासून या रस्त्याच्या एका बाजूला जाळ्या बसवल्या. त्यामुळे शहरातील अशा षडयंत्रकारी विकृतांना म्हाळुंगीचे पात्र वगळता पर्याय राहीला नसतानाच आता चंद्रशेखर चौकातून संगमनेर खुर्दच्या दिशेने जाणारा रिंगरोड काही विकृतांनी लक्ष्य केल्याच्या तक्रारी समोर येवू लागल्या आहेत. विशेष म्हणजे गणेश विसर्जनाच्या प्रमुख परिसरासह शांतीघाट आणि संगमनेर खुर्दसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला जोडणार्या शहरातंर्गत रस्त्यामुळे हा भाग नेहमीच वर्दळीचा असतो. सकाळच्या सत्रात शहरातील वसतीगृहात राहणार्या व संगमनेर खुर्दमधील महाविद्यालयात वैद्यकिय शिक्षण घेणार्या शेकडों विद्यार्थीनी याच रस्त्याने जातात. पालिकेने या भागातही मियावाकी पद्धतीचे वृक्षारोपण करुन परिसर हरित करण्याचा उपक्रम राबवला आहे.

अलिकडेच या रस्त्याचे डांबरीकरणही झाल्याने एका बाजूला प्रवरामाईचा काठ आणि दुसर्या बाजूला दाट झाडी यामुळे स्वामीसमर्थ रिंगरोडनंतर हा रस्ता निसर्गरम्य भासत होता. मात्र डोक्यात षडयंत्राची विकृती घेवून मिरवणार्यांना शहराच्या सौंदर्यात होणारी ही वाढ पाहवली नाही आणि गेल्याकाही दिवसांपासून त्यांनी प्रचंड वर्दळीचा आणि अलिकडेच सौंदर्य बहरलेला हा रस्ता लक्ष्य करुन पशूंच्या कत्तलखान्यातील टाकावू अवशेषांची नियमाने विल्हेवाट न लावता प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुपचूप या रस्त्यावर आणून टाकण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. अचानक पुन्हा सुरु झालेल्या या प्रकारामुळे या रस्त्याचा वापर करणार्या विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला असून अशा विकृतींचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. खरेतर काहींकडून शहराच्या सामाजिक शांततेला वारंवार नख लावण्याचा प्रयत्न होत असताना अचानक सुरु झालेला हा प्रकार प्रशासनाने फौजदारी कट म्हणून गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून त्याच्या मूळाशी जाण्याची गरज आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या गरजा म्हणून शहरातील काही भागात मांसाहारी पदार्थ पुरविणार्या दुकांनाची संख्याही वाढली आहे. अशा ठिकाणांवर कापल्या जाणार्या पशूंच्या टाकावू अवशेषांची पद्धतशीर विल्हेवाट लावली जावी यासाठी स्वतंत्र नियमावली आहे. शहरीभागातील या ठिकाणांवरील घाण नेण्यासाठी पालिकेची घंटागाडी नियमित सेवा देते. मात्र त्या उपरांतही काहीजणांकडून जाणीवपूर्वक त्या सुविधा टाळून सार्वजनिक वाहतुकीचे रस्ते अथवा ठिकाणांना लक्ष्य करुन त्यातून दुर्गंधी, रोगराई, श्वानांची संख्या या गोष्टी घडतील हे माहीत असतानाही घडणारा हा प्रकार गुन्हेगारी कटाचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यातून सामाजिक सौहार्दाला नख लागण्यापूर्वीच प्रशासनाने त्याच्या मूळाशी जावून अशाप्रकारच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे.

शहरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यातील कापलेल्या जनावरांचे रक्त आणि मांस गटारांद्वारा थेट प्रवरानदीपात्रात सोडण्यात आल्याचे आरोप यापूर्वीही अनेकदा झाले आहेत. अतिशय संतापजनक असलेल्या या प्रकारामुळे सुकेवाडी, खांजापूरसह अनेक ग्रामपंचायतीचे नदीपात्रातील पाण्याचे उद्भव दुषीत होवून त्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्याही तक्रारी होत्या. त्या कायम असतानाच आता मोठ्या लोकसंख्येकडून वापरल्या जाणार्या निसर्गरम्य रस्त्यांसह पाण्याच्या स्रोतांना लक्ष्य करुन अशाप्रकारची घाण टाकण्याचा हा प्रकार खूप गंभीर आहे. त्याचा सखोल तपास होण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

