अनधिकृत जमीन वापराची चौकशी करा! आरपीआयचे राहुरी तहसीलदारांना निवेदन
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील गुहा येथील गट क्रमांक 330/1 मधील एका डेव्हलपर्स कंपनीच्या अनधिकृत जमीन वापराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाच्यावतीने राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनात जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी म्हटले की, गुहा येथील गट क्रमांक 330/1 मध्ये एका डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने डांबर मिक्सिंगसाठी प्लॅन्ट उभारला असून नगर ते कोपरगाव रस्ता डांबरीकरण आणि खडीकरणासाठी आवश्यक प्रक्रिया उद्योग गट क्रमांक 330/1 मध्ये चालणार आहे. मात्र, त्या गटाचे व्यावसायिक कारणासाठी वापर होत असेल तर त्या गटाचे अकृषक क्षेत्रात रूपांतर करणे आवश्यक आहे. तसेच गुहा ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राची सुद्धा आवश्यकता आहे. त्याठिकाणी डांबराच्या मिक्सिंग यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होऊन आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत आहे.
याचबरोबर या क्षेत्राच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू आहे. गटाचा व्यावसायिक कारणासाठी वापर करण्यापूर्वी त्या गटाचे अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे काय? नसेल तर डेव्हलपर्स कंपनीने त्या गटाचा अनधिकृत वापर कुणाच्या आशीर्वादाने केला आहे? तसेच वेगवेगळे यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होणार आहे. त्यावर काय उपाययोजना केली? याची चौकशी करून विनापरवाना व्यावसायिक कारणासाठी या गट क्रमांकाचा वापर केला. याबाबत दंडात्मक कारवाई तातडीने करून शासनाचा महसूल बुडत असल्याने कारवाई करावी. अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, उपतालुकाध्यक्ष रमेश पलघडमल, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक खरात, शहराध्यक्ष प्रतीक रूपटक्के आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.