सोशल माध्यमातील इच्छुकांची थेट पालिका सभागृहात ‘एन्ट्री’! ‘फिक्स’ नगरसेवकांचा सर्वत्र बोलबाला; उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकांचा मुहूर्त नूतन वर्षापर्यत लांबला असला तरीही इच्छुकांच्या उत्साहात मात्र इंचभरही ओहोटी आलेली नाही. प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्यासाठी अद्यापही दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यातही तब्बल नऊ वर्षानंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्याही लक्षणीय असणार आहे. अशावेळी कशात काहीच नसताना उगाच नाराजी नको म्हणून नेत्यांनीही सोयीस्कर मौन बाळगताना दहा-वीसजणांना घेवून येणार्या प्रत्येकाच्याच पाठीवर हात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम सोशल माध्यमात दिसू लागला असून काहींनी तर आपला विजय जाहीर करुन थेट पालिकेच्या रामकृष्ण सभागृहातही ‘एन्ट्री’ मारली आहे. प्रभागरचना, प्रारुप मतदारयाद्यांचे काम सुरु असताना सोशल माध्यमातून हा आभाशी प्रचार सुरु झाल्याने ऐन दिवाळीच्या काळात संगमनेरकरांनाही मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाले असून फिक्स, भावी, विजय आपलाच मानणार्या इच्छुकांच्या समर्थकांचेही चांगलेच फावले आहे. या सर्वांचा परिपाक आधीच तुल्यबळ होत असलेल्या संगमनेरच्या निवडणुकीत प्रत्यक्ष तिकिटांचे वाटप करताना राजकीय पक्षांचा कस लागणार हे मात्र निश्चित आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या परिवर्तनामुळे यंदा संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीलाही अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. संगमनेरच्या राजकीय स्थितीचा विचार करता यंदा पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणार्या आमदार सत्यजीत तांबे यांनी लढाईचे धोरण बदलण्याचे संकेत दिल्याने तिकिट वाटपातही त्याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे. तर, राज्यात महायुती स्थापन झाल्यापासून आजवर एकदाही पालिकेत दमदार यश मिळवून सत्ता काबिज करण्यात अपयशी ठरलेल्या शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांकडून अद्यापही पत्ते उघडण्यात आलेले नाहीत. अशा स्थितीत संगमनेर नगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढणार की स्वबळावर याबाबतचा संभ्रम आजही कायम आहे.

या निवडणुकीपूर्वी तब्बल नऊवर्ष आधी 2016 मध्ये पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेसह (संयुक्त) राष्ट्रवादी पक्षही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळीही तशीच स्थिती दिसत असून सुरुवातीला महायुतीसाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला सूर बदलल्याने महायुती की स्वबळ याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांकडेच येण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी चार दशकानंतर महायुतीला काँग्रेसचा बालेकिल्ला मिळवून देणार्या आमदार अमोल खताळ यांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच कशात काहीच नसतानाही उत्साहाच्या शिखरावर झोके घेणारे इच्छुक रोजच आपल्या पाच-पन्नास समर्थकांसह त्यांच्या कार्यालयात घिरट्या घालून ‘कौल’ मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

त्यातील काहींनी सोशल माध्यमात वेगवेगळ्या रिल्सही तयार केल्या असून त्यात भावी नगरसेवक, फिक्स नगरसेवक, फिक्स बिनविरोध, परिवर्तनाचा शिलेदार, हक्काचा माणूस, ओनली.. अशा शब्दांचा वापर करुन आपल्या मनातील इच्छा सोशल माध्यमाच्या रुपाने व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अशा रिल्स अथवा सोशल पोस्टच्या खाली इच्छुकांच्या समर्थकांनी व्यक्त केलेली मतंही वाचणीय असून ‘भाऊला संधी म्हणजे विजयाला गवसणी’ अशी स्तुती सुमनं उधळीत इच्छुकाच्या खिशावरच नियंत्रण मिळवले आहे. सर्वसामान्यांसाठी मात्र हा प्रकार मनोरंजन ठरत असून रोज उगवणारे इच्छुकांचे नवीन पीकं पाहून दिवाळीपूर्वीच संगमनेरकर खमंग राजकीय फराळाचा आनंद घेताना बघायला मिळत आहेत.

पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेतृत्व यंदा आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडे आहे. आगामी निवडणुकीची संपूर्ण व्यूहरचनाही त्यांच्याकडूनच आखली जाणार आहे. सत्ताधारी गटाकडून यावेळची निवडणूक विकास आघाडी करुन लढवली जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. त्यासाठी आमदार तांबे शहरातील वेगवेगळ्या गटांशी संपर्क साधीत असताना त्यांच्याही वलयातील काही माजी नगरसेवकांनी आपली उमेदवारी ‘फिक्स’ मानून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरीही सत्ताधारी गटाकडून इच्छुक असलेल्या जवळजवळ एकाही उमेदवाराने सोशलमधून तिकिटाची मागणी केलेली नाही किंवा भावी, फिक्स म्हणतं राजकीय दबावही निर्माण केलेला नाही. मात्र या उपरांतही तांबे गटाकडेही इच्छुकांची मोठी संख्या आहे.

एकंदरीत विविध नाट्यमय घडामोडी आणि सर्वोच्च आदेशामुळे महिनाभर विलंबाने का होईना पण तब्बल नऊ वर्षांनंतर पालिकेची निवडणूक होत असल्याने दोन्ही बाजूने नशिब आजमावणार्यांची मोठी संख्या असणार आहे. सोशल माध्यमातून सुरु असलेला निवडणूकपूर्व प्रचार पाहता त्याची व्याप्तीही वाढण्याची शक्यता असून त्यातून नेत्यांचा मात्र कस लागणार आहे हे निश्चित.

सोशल माध्यमात फिक्स, भावी, विजय आपलाच असे म्हणतं राजकीय दबाव निर्माण करु पाहणार्या इच्छुकांमधील महायुतीच्या काही ‘भावीं’नी तर चक्क आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयात बसूनच ‘रिल्स’ तयार केले आहेत. त्यांची ही कृती त्यांच्या प्रभागातील सक्षम उमेदवारांच्या इच्छेला मूरड घालणारी ठरत असल्याचेही दिसून आले आहे. त्यातून एकाच प्रभागात एकाच पक्षाकडून इच्छुक असलेल्यांचा मोठा भरणा असल्याचेही स्पष्ट होत असून भावींची संख्या पाहता यंदा बंडखोरीची अतिवृष्टी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

