निसर्ग परिचय केंद्रात रंगला नव्वद सवंगड्यांचा स्नेहमेळावा बाळेश्वर विद्यालयाच्या 1992 मधील दहावीतील मित्र-मैत्रिणी रमले जुन्या आठवणींत

नायक वृत्तसेवा, घारगाव
सोशल मीडियाच्या वापरातून अवघे जग जवळ आले आहे. याचा प्रत्यय वेळावेळी येत आहे. व्हाट्सअॅप ग्रुप तयार करुन त्याद्वारे दीपावलीच्या सुट्ट्यांत सर्व बालपणीच्या मित्र-मैत्रिणींना स्नेहमेळाव्यासाठी आमंत्रित केले. आणि बघता बघता तब्बल 90 सवंगड्यांचा हा मेळावा रंगतदार झाला.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सारोळे पठार येथील श्री बाळेश्वर विद्यालयाच्या 1992 तील दहावीच्या तुकडीची ही कहाणी आहे. नवनाथ जाधव, भिकन सय्यद, संदीप पोखरकर, सुनील जाधव व बाळासाहेब भागवत यांनी 2017 मध्ये आपले बालपणीचे मित्र-मैत्रिणी शोधण्यास सुरुवात केली होती. एक-एक करत तब्बल 90 जणांना शोधण्यात यश मिळाले. मग त्यानंतर ग्रुपवर बोलणे सुरू झाले. कधी मस्करी, कधी गप्पा तर कधी वादविवाद सुद्धा होऊ लागले. पण तरीही मित्रांची संख्या वाढतच गेली. वाढत्या संख्येबरोवर मैत्रीची वीण सुद्धा घट्ट होत गेली. संगीता नेहे, आशा फटांगरे, छाया घुले, ज्योती फटांगरे, मंगल फटांगरे, बायसा घुले, रंजना भोर, सिंधू फटांगरे, अनिता फटांगरे, छाया पोखरकर, शारदा भोर या बालमैत्रिणीही ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. मग सगळ्यांना पुन्हा एकदा बालपणीचे दिवस आठवले आणि सर्वांनी पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातूनच ‘स्नेहमेळावा’ (गेट टू गेदर) घेण्याचा विषय सर्वानुमते ठरविला. त्यानुसार दिवस निश्चित करुन मित्रांनीही आर्थिक योगदान देण्याचे मान्य केले. चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्र येथे हा मेळावा पार पडला.

यानिमित्ताने प्रत्येक मित्रास कायमची आठवण राहावी म्हणून प्रत्येक मित्रास एक सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देण्याची सूचना शिवाजी फटांगरे, विकास जाधव, आशा फटांगरे यांनी मांडली त्यास सर्व मित्रांनी दुजोरा दिला. संदीप पोखरकर व सुनील जाधव यांनी सन्मानचिन्ह तयार करून घेतले. त्यावर प्रत्येक मित्राचे नाव टाकून प्रत्येकाला देण्यात आले. याशिवाय सर्व मित्र-मैत्रिणींना डौलदार फेटे बांधण्यात आले होते. फेट्याच्या नियोजनात राधेश्याम गाजरे आणि यशवंत पोखरकर यांनी विशेष लक्ष दिले. त्याचप्रमाणे या उपस्थितीची आठवण म्हणून छायाचित्राची फ्रेम मित्र-मैत्रिणींना आठवण म्हणून लगेच देण्याची संकल्पना नवनाथ जाधव, अनिल मेढे, संगीता नेहे यांनी मांडली. ती त्याच दिवशी प्रत्येकास देण्यात आली. दुपारच्या वेळेत सर्वांसाठी मेजवणीची भिकन सय्यद, यशवंत पोखरकर व सहकारी मित्रांनी केली होती.

या कार्यक्रमात संदीप पोखरकर व बाळासाहेब भागवत यांना रोटरी क्लबचा राष्ट्रबांधणीचे शिल्पकार आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर भाऊसाहेब काकड यांना मल्टीस्टेट बँकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि ग्रुपचे सदस्य जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी कोरोना कालावधीत विशेष सेवा दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रुपचे सदस्य भाऊसाहेब कडू यांनी आपला ‘झालर’ हा कविता संग्रह सर्व मित्रांना मोफत वाटप केला. त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शेवटी ग्रुपचे सदस्य भिकन सय्यद यांच्या दोस्ती बेंजोच्या तालावर नाचण्याचा सर्वांनी मनसोक्त असा आनंद घेतला.

सूत्रसंचालन आशा फटांगरे व नवनाथ जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी दत्तात्रय फटांगरे, शरद घुले, कैलास गोडे, बाळासाहेब फटांगरे, गोविंद बांबळे, बाळासाहेब वाघ, संतोष कसबे, संतोष घुले, शिवाजी बांबळे, राधेश्याम गाजरे, मारुती वाळेकर, रामनाथ तांगडकर, गुलाब घुले, साहेबराव गुळवे, पंढरी घुले, सोपान भोर, दिलीप फटांगरे, मच्छिंद्र घुले, सुभाष घुले, दौलत घोडे, अर्जुन वाजगे, संजय मोरे, रोहिदास फटांगरे, रमेश बांबळे, रोहिदास घुले, हरिभाऊ घुले, दत्तात्रय हेंद्रे, बाळासाहेब आगलावे, कैलास घुले, चांगदेव काळे, नंदकिशोर बैरागी, बाबाजी आगलावे, विलास काकड, गोरक्ष ढेरंगे, बाळासाहेब मदने, श्रीकांत पडवळ, नंदकुमार लोहकरे, बस्तीराम गोफणे, भाऊसाहेब फटांगरे, बाळासाहेब जगताप, साहेबराव जाधव, रमेश लहामगे, यशवंत पोखरकर, अनिल घुले आदी उपस्थित होते.
