साईबाबांच्या चरणी 50 हजार डॉलर्सचे दान अमेरिकेतील डॉक्टर दाम्पत्याने साई संस्थानला दिला धनादेश
नायक वृत्तसेवा, शिर्डी
सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या दरबारात दररोज देश-विदेशातून हजारो साईभक्त दर्शनासाठी येत असतात. आता एका साईभक्ताने जे मूळचे पंजाबचे आहेत. आणि सध्या कॅलिफोर्नियात डॉक्टरकी करत असलेल्या अखिल शर्मा आणि त्यांच्या पत्नी अपर्णा शर्मा यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानचे लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्याकडे 50 हजार डॉलरचा धनादेश (चेक) सुपूर्द केला. या डॉलरचे भारतीय रुपयातील मूल्य हे जवळजवळ 41 लाख रुपये इतके आहे.
आपण दिलेल्या या देणगीचा विनियोग साईसंस्थान मार्फत चालविण्यात येत असलेल्या रुग्णालयात करण्याची इच्छा शर्मा यांनी व्यक्त केली आहे. साईबाबांना देणगी देवू शकत नाही. मात्र जितकं होता होईल तितकं त्यांच्या चरणी अर्पण करत असल्याची भावना दानशूर पती पत्नीने व्यक्त केली आहे. शर्मा यांचं पूर्ण कुटुंबीय वैद्यकीय क्षेत्रात काम करतंय. त्यांनी दिलेलं हे दान 2022 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील मोठं दान ठरलंय.

दरम्यान, साईबाबा संस्थानचे लेखा अधिकारी कैलास खराडे यांनी यावेळी साईभक्त शर्मा कुटुंबियांचा शाल, साई चरित्र देवून सन्मान केला आहे. त्याचबरोबर या दानशूर भाविकांनी साईबाबा संस्थानच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या साईबाबा हॉस्पिटललाही भेट दिली. हॉस्पिटलमध्ये कुठल्या वस्तूंची कमतरता आहे, हॉस्पिटलमध्ये कुठल्या वस्तूंची आवश्यकता आहे. त्या देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
करोनाच्या नवीन व्हेरिएंट्सच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. त्यामुळे आता शिर्डीतील साई संस्थान देखील खबरदारी घेत आहे. साईभक्तांनी मास्क वापरवा, तसेच सोशल डिस्टन्स ठेवावे, असे आवाहन साईबाबा संस्थानचे प्रभारी सीईओ राहुल जाधव यांनी केले आहे. साईबाबा मंदिर परिसरात येताना साईभक्तांनी मास्क घालावा. तसेच सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ठेवावे, याबाबत साईबाबा संस्थानच्यावतीने कोणालाही सक्ती केलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी कोविड नियमांचे पालन करावे, जेणेकरून करोना संसर्गचा फैलाव आपण रोखू शकतो. साईबाबा संस्थानने केलेल्या आवाहनानंतर अनेक साईभक्त आपल्या तोंडावर मास्क लावताना दिसत आहे.