टायर अंगावर उडून पडल्याने फळविक्रेत्याचा दुर्देवी मृत्यू

टायर अंगावर उडून पडल्याने फळविक्रेत्याचा दुर्देवी मृत्यू
नायक वृत्तसेवा, नेवासा
टेम्पोचा निखळलेला टायर अंगावर उडून पडल्याने बत्तीस वर्षीय फळविक्रेते व युवा कार्यकर्ते संदीप जोंधळे हे जखमी होऊन मृत झाल्याची दुर्दैवी घटना नेवासाफाटा येथील मुख्य चौकात गुरुवारी (ता.2) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


अहमदनगरकडून औरंगाबादकडे रात्रीच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो (क्रमांक एम.एच.12 एन.एक्स.6157) जात असताना टेम्पोच्या डाव्या बाजूच्या मागचे दोन्ही टायर निखळले. त्यात पहिले टायर वेगाने रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने शेवगाव चौकापासून पुढे निखळत जाऊन इतक्या जोरात उडाले की ते नेवासाफाटा येथील जगताप मिठाईवाले यांच्या दुकानाच्या समोरील पोलला धडकले. तेथे आपल्या फळांचे दुकान बंद करून उभ्या असलेल्या संदीप बाळासाहेब जोंधळे (वय 32) यांना त्या टायरचा जोराचा फटका बसल्याने डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले. अनेक वर्षांपासून युवा कार्यकर्ते असलेले संदीप जोंधळे हे फळांचे दुकान चालवत होते. राज्य परिवहन महामंडळात सेवा केलेले कामगार नेते बाळासाहेब जोंधळे यांचा मयत संदीप हा मुलगा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, भावजय असा मोठा परिवार आहे. या दुर्देवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

Visits: 3 Today: 1 Total: 29235

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *