परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

नायक वृत्तसेवा, आश्वी
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द, चणेगाव, झरेकाठी परिसरात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला होता. मागील काही दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे या भागात शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. परिणामी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या परिसरातील कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी, तुर, कांदा यांसारखी प्रमुख पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सहाय्यक कृषी अधिकारी प्रांजल कानडे, ग्राम महसूल अधिकारी अनुपमा गांगुर्डे, तसेच ग्रामपंचायत अधिकारी संग्राम चांडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
संबंधित पथकाने १०० टक्के पंचनामा मुदतीत पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. पिकांचे गंभीर नुकसान लक्षात घेऊन शासनाकडे योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई वर्ग करावी, अन्यथा या भागातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची माहिती पोलिस पाटील भाऊराव लोहाळे, अँड. पोपट वाणी, सरपंच सतिश जोशी, इंद्रभान ढमक, नवनाथ गुळवे, रामलाल गव्हाणे, बापू जोशी, सरपंच भाग्यश्री खेमनर, ज्ञानेश्वर वाडगे, सुभाष पाटोळे,ज्ञानेश्वर खेमनर, रामनाथ ढमक, अण्णासाहेब गुळवे,भाऊ पावडे आदींनी केली आहे. याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी प्रांजल कवडे म्हणाल्या की,कपाशी, सोयाबीन, मका, कांदा या पिकांचे गंभीर नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे पूर्ण केले असून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करणार आहोत.या भागातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. पाणी ओसरण्यानंतर ही परिस्थिती बिकट आहे. पंचनामे पूर्ण करून अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवले जात असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी अनुपमा गांगुर्डे यांनी दिली.

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन कपाशी, सोयाबीन लावले होते. पण सगळे पाण्याखाली गेले. आता हातात काहीच नाही. शासनाने तातडीने मदत दिली नाही, तर दिवाळी काळी होणार.जनावऱांचा चारा सडुन गेला आहे.यामुळे चारा टंचाई निर्माण झाली दाढ खुर्दचे सरपंच सतीश जोशी यांनी सांगितले.

Visits: 232 Today: 10 Total: 1107405
