ममदापूरात पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा!

नायक वृत्तसेवा, लोणी
गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या ममदापूरच्या कुरेशी मोहल्यातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत जिवंत गोवंशीय जनावरांसह तब्बल एक टन गोमांस जप्त केले. गुन्हे शाखेच्या या कारवाईदरम्यान येथील कसायांनी मात्र अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

राहाता येथील गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांना ममदापूर गावातील कुरेशी मोहल्यात काही इसमांनी येथील काटवनात गोवंश जनावरे डांबून ठेवली असून त्यातील काही जनावरांची ते कत्तल करत आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यावर या गोरक्ष दलाच्या टीमने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. निरीक्षक कबड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व त्यांच्या पथकाला ममदापूर येथे कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहाता, बाभळेश्वर, उक्कलगाव, बेलापूर येथील गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांसमवेत रात्री ८.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले. त्याचबरोबर काही जनावरे काठवण्यात बांधलेली आढळून आली. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात आल्यावर येथील कसायांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी येथून १८ जिवंत गोवंशीय जनावरांसह तब्बल एक गोमांस जप्त केले.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गायांच्या हाडांचा साठा, कातडी आणि वेस्टेज मांस दिसून आले. तब्बल एक विहीरभर निरुपयोगी मांस, शेकडो टन कातडी आणि हाडांचा साठा मिळून आला.

Visits: 47 Today: 2 Total: 1114866
