रेणुका कला केंद्रावर टोळक्याचा हातात कोयते घेऊन धुडगूस; परस्परविरोधी तक्रारी दाखल 

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
जामखेड तालुक्यातील मोहा  येथील रेणुका कला केंद्रावर चार जणांच्या टोळक्यांने हातात कोयते घेऊन धुडगूस घातला. याप्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
थिएटरचे मालक अनिल पवार व त्यांची मुले परसू पवार, मोहित पवार यांना कोयत्याचा धाक दाखवत आम्हाला दर महिन्याला एक लाख रुपये आणून द्यायला सांगा, नाहीतर आम्ही थिएटर चालू देणार नाही, असे म्हणत टोळक्याने धमकावले. तसेच कोयत्याने थिएटरमधील खुर्चा, टेबल व दुचाकींची तोडफोड केली.  नृत्यकाम करणाऱ्या मुलींची छेड काढून त्यांच्याशी अश्लिल वर्तन केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध खंडणी, विनयभंग व आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेणुका कलाकेंद्रातील नृत्यांगना ज्योती शिवाजी जाधव (वय ४५) हिने जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मोहा येथील अनिल पवार यांच्या रेणुका कलाकेंद्रावर  रात्री ८.४५ वाजता नृत्यकाम करीत असताना तेथे शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर, (सर्व रा. आष्टी) व अक्षय मोरे (चिंग्या) (रा. जामखेड) हे हातात कोयते घेऊन आले. तसेच त्यांनी हातातील कोयत्याने थिएटरमधील खुर्चा, टेबल व  दोन दुचाकींची तोडफोड केली. नृत्यकाम करणाऱ्या मुलींची छेडछाड केली व अश्लील वर्तन केले. कान्होपात्रा येथे थिएटर मालक अनिल पवार यांनी नवरात्र उत्सवानिमित्त लावलेले बॅनर फाडले, तसेच त्यांच्या बीड रोड येथील हॉटेलची तोडफोड केली. रेणुका कलाकेंद्रात आल्यावर ते नेहमीच दमदाटी करुन मुलींना नृत्यकाम करण्यास सांगतात. पैसे न देताच निघुन जातात. मालक अनिल पवार यांना दमदाटी करुन पैसे घेऊन जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी दुसरी फिर्याद शुभम लोखंडे याने दाखल केली आहे. जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथील महादेव मंदिराकडे जाताना चारचाकी वाहन लावले असता, तेथे आलेल्या स्कार्पीओ वाहनातील परशू पवार याने घरच्यांना गाडी का आडवी लावली, या कारणावरुन नटराज कला केंद्र येथे बोलावून फिर्यादी व त्याचा मित्र सतीश विठ्ठल टकले यांना शिवीगाळ, दमदाटी केली. कत्ती (कुकरी), दगड, लोखंडी चैन, लोखंडी चॅनल व दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.
Visits: 206 Today: 1 Total: 1794950

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *