संगमनेर-अकोले रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त!
कोल्हार-घोटी राज्यमार्गाची ठिकठिकाणी दुरावस्था

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर आणि अकोले या दोन महत्त्वपूर्ण तालुक्यांना जोडणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. विशेषतः संगमनेर तालुक्यातील मंगळापुर परिसरात असणाऱ्या दौलत पेट्रोल पंप ते कळस बुद्रुक या सुमारे १२ किलोमीटरच्या अंतरात या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हेच वाहन चालकांना समजणे मुश्किल झाले आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालक त्रस्त झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अकोले आणि संगमनेर तालुक्यासाठी हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून ये-जा करतात. यामध्ये एसटी बस, दूध आणि भाजीपाला वाहतूक करणारे टेम्पो, मालवाहू ट्रक, खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मंगळापुर परिसरातील दौलत पेट्रोल पंप ते चिखली ते कळसपर्यंतच्या पट्ट्यात या मार्गावर मोठ मोठे आणि खोल खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.

या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टायर फुटणे, सस्पेंशन खराब होणे आणि इतर तांत्रिक बिघाड वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. याशिवाय, सततच्या हादऱ्यांमुळे प्रवाशांना मणक्याचे आणि मानेचे आजार जडत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरत असून, खड्डे चुकवण्याच्या नादात अनेकदा वाहने घसरून अपघात घडत आहेत. नागरिकांना रोज याच रस्त्यावरून संगमनेरला कामासाठी जावे लागते. शेतकऱ्यांसाठीही हा रस्ता महत्वाचा आहे , परंतु आपला शेतमाल, भाजीपाला आणि दूध, वेळेवर बाजारपेठेत पोहोचणे गरजेचे असते, पण खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होतो आणि बाजारपेठेत पोहोचायला देखील उशीर होतो. यामुळे शेतीमालाचे नुकसान होते. तसेच या मार्गावरून प्रवास करताना वाहनांचेही मोठे नुकसान होत असून, दुरुस्तीच्या खर्चाचा अतिरिक्त भुर्दंड वाहनमालकांना सोसावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे कानाडोळा केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन रस्त्याचे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने डांबरीकरण किंवा रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

संगमनेर शहरातील मेनरोड, अकोले नाका हा रस्ता देखील कोल्हार – घोटी राज्य मार्गावर येतो. माळीवाडा ते अकोले नाका या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत शारदा विद्यालय असल्याने याठिकाणी नेहमी वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे छोटे – मोठे अपघात याठिकाणी नेहमीच होत असतात. संबंधित विभागाने ज्या ठेकेदाराने हा रास्ता केला आहे. त्याच्याकडून दुरुस्त करून घ्यावा किंवा त्याच्याकडून डांबरीकरण करून घ्यावे, तसे ठेकेदाराने न केल्यास संबंधित विभागाने रास्ता चांगला करावा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Visits: 153 Today: 3 Total: 1114511
