एस. आर. थोरात समूहामार्फत 11 कोटी 85 लाख बँकेत वर्ग कायम दूध उत्पादकांच्या हिताचाच निर्णय होईल ः थोरात


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील एस. आर. थोरात दूध समूहामार्फत मागील 29 वर्षांची परंपरा जपत दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध दर फरकासोबत आगाऊ दूध पेमेंट 15 ऑक्टोबर अखेरपर्यंत, वाहतूक पेमेंट, दूध वितरक कमिशन, कर्मचारी पगार व बोनस आणि सभासद लाभांश असे एकूण 11 कोटी 85 लाख रुपये बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत.

संचालक मंडळ बैठकीत संस्थेचे संचालक पृथ्वीराज थोरात यांनी मत व्यक्त करताना संस्थेने दूध उत्पादकांसाठी गतवर्षात राबविलेले उपक्रम दूधाळ गायी खरेदीसाठी व संगोपनासाठी आय. सी. आय. सी. आय बँक व किसान क्रेडीट कार्ड योजनेमार्फत एक कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर ‘मिशन गगनभरारी’च्या अंतर्गत पशुवैद्यकीय सेवा, संतुलित आहार, गोठा विकास, आरोग्य विमा आणि उत्तम प्रतीच्या दुधासाठी निरोगी गायी, म्हशी असणे गरजेचे असते. त्यामुळे नैसर्गिक सेंद्रीय व पूरक पोषक चारा लागवडीसारखे यशस्वी उपक्रम राबवत आहोत. त्यातच यावर्षी लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण होते अशावेळी डेअरी तर्फे दूध उपलब्ध करून देणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देत माहिती पत्रक वाटण्यात आले. त्यामध्ये लसीकरणाबाबत माहिती देऊन जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पुढील काळात प्रतिजैविके व बुरशी विरहित दूध निर्मितीसाठी संस्था आग्रही राहणार आहे. संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब थोरात बोलताना म्हणाले, देशभर कोरोनाच्या महामारीमुळे दोनदा लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झाला. परंतु याचा सर्वाधिक फटका हा दूध उत्पादकांना सहन करावा लागला. त्याचबरोबर कोरोना काळात कृत्रिम रेतनाकडे दुर्लक्ष झाले. तसेच यावर्षी पावसाळा पाच महिने चालल्यामुळे पशुपालकांना अधिक त्रास झाला. सोबतच जनावरांमध्ये लम्पी रोगाची साथ पसरली व दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणात घटले गेले. या सर्वांचा परिणाम स्वरूप आज दूध दारात प्रचंड तेजी निर्माण झालेली आहे. यामुळे शेतकरी वर्गास थोडाफार दिलासा मिळाला आहे. तसेच लम्पी रोगाच्या लसीकरणाच्या बाबतीत शासनाकडे पाठपुरावा करत जास्तीत जास्त व लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी जिल्हा दूधविकास अधिकार्‍यांसमवेत प्रयत्न करण्यात आला असल्याचेही सांगितले.

स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांच्या राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक व शेतकर्‍यांच्या हिताने भारावलेल्या विचारांच्या प्रेरणेतून डेअरी नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेत आली आहे व यापुढे देखील दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास देत उद्योग समूहाच्या हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रदूषण विरहित आनंदाने दीपावली साजरी करण्याचे आवाहन उद्योग समूहाचे संचालक देवराज थोरात यांनी केले.

Visits: 191 Today: 1 Total: 1600149

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *