विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू!

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
रानडुक्करे अथवा इतर वन्य प्राणी मकाच्या शेतात घुसून नासाडी करू नयेत म्हणून एका शेतकऱ्याने शेताभोवताली तारेच्या कुंपणात विना परवानगी विद्युत प्रवाह सोडला होता. मात्र, या कुंपणाला स्पर्श होताच विजेचा धक्का बसून ६८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा गावच्या शिवारात घडली. बारकु धर्मा लांडगे (रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी मयताचा मुलगा अंबादास बारकू लांडगे (वय ४०, रा. पिंपळगाव लांडगा) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात शेतातील कुंपणाला वीज प्रवाह सोडणारा शेतकरी संतोष प्रल्हाद लांडगे (रा. पिंपळगाव लांडगा) यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत बारकू लांडगे हे मंगळवारी सकाळी १०.२० च्या सुमारास त्यांच्या शेतात चाललेले होते. त्यांच्या शेताशेजारीच संतोष प्रल्हाद लांडगे यांचे शेत असून त्यात त्यांनी मका लावलेली आहे. त्या मकाच्या शेतात रात्रीच्या वेळी रानडुक्करे अथवा इतर वन्य प्राणी जावू नयेत आणि नुकसान करू नयेत यासाठी त्यांनी शेताला तारेचे कुंपण घातलेले आहे. या कुंपणात त्यांनी कुठलीही परवानगी न घेता वीज प्रवाह सोडला. त्याबाबत बारकू लांडगे यांना कुठलीही कल्पना नसल्याने तारेच्या कुंपणाजवळून जात असताना त्यांना जोरात विजेचा शॉक बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूस संतोष लांडगे हेच जबाबदार असल्याचे अंबादास लांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.

Visits: 17 Today: 3 Total: 1110656
