इस्रोच्या सहलीसाठी आदिती देवकरची निवड

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
गुरुदेव दत्त एज्युकेशन सोसायटी, सावरगाव संचलित कै. अनिल दिगंबर मुळे विद्यालयाची पाचवीची विद्यार्थिनी आदिती राहुल देवकर हिने अवकाश संशोधन क्षेत्रातील डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत तालुक्यात पाचवा क्रमांक मिळवला. यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या सहलीसाठी आदितीची निवड झाली.

या कार्यक्रमांतर्गत आदितीबरोबरच निवडक विद्यार्थ्यांना इस्रोच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची, कार्यशाळेत सहभागी होण्याची आणि अवकाश संशोधनाच्या मूलभूत संकल्पना समजावून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर आदितीने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत ३०० पैकी २३२ गुण मिळवून तालुक्यात दुसरा क्रमांक, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी १९८ गुण मिळवून उत्तीर्ण झाली. आदितीने या निवड प्रक्रियेत आपली बुद्धिमत्ता आणि उत्साहाने सर्वांना प्रभावित केले आहे. आदिती देवकरच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कुलकर्णी, सचिव सुनीता संजय कुलकर्णी, उपाध्यक्ष संतोष कावले, संचालक मधुकर मेहेत्रे, मुख्याध्यापिका देठे यांसह सर्व शिक्षक वृंद, संस्था पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालकांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 43 Today: 1 Total: 1098507
