जामगाव येथील ‘रासेयो’ शिबिराचा उत्साहात समारोप राजूरच्या अॅड. देशमुख महाविद्यालयाचे शिबिरात विविध उपक्रम

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर येथील अॅड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा समारोप नुकताच जामगाव येथे पार पडला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा या विषयावर हे शिबिर पार पडले. ग्रामस्वच्छता, नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, वृक्ष संवर्धन, एड्स जनजागृती, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, शिवार फेरी, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा इत्यादी उपक्रम शिबिरात राबविण्यात आले.

सदर शिबिर कालावधीत विविध तज्ज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने झाली. प्रा. जगन्नाथ आरोटे यांचे आहार व आरोग्य, अॅड. रंजना गवांदे यांचे जात पंचायती व जात वास्तव, प्रा. डॉ. भरत शेणकर यांचे संत साहित्यातील अंधश्रद्धा निर्मूलन, संदीप वाकचौरे यांचे शिक्षणासमोरील आव्हाने, प्रा. अजय पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक साम्य प्रा. डॉ. पंढरीनाथ करंडे यांचे पर्यावरण संरक्षण, प्रा. डॉ. विजय भगत यांचे माणूस होण्याचा प्रवास, प्रा. डॉ. लहू काकडे यांचे आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांवर व्याख्याने झाली.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रासेयोचे स्वयंसेवक रवींद्र बांडे व शीतल पोखरकर यांचा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच शिबिरात राबविलेल्या विविध उपक्रम व स्पर्धांचे पारितोषिक वितरणही यावेळी झाले. या समारोप कार्यक्रमास जामगावचे कामगार पोलीस पाटील गीताराम महाले व माजी प्राचार्य मुरलीधर बारेकर हे प्रमुख अतिथी होते. अध्यक्षस्थान सत्यनिकेतन संस्थेचे सहसचिव मिलिंद उमराणी यांनी भूषवले. कार्यक्रमाला अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, जामगावच्या माजी सरपंच उषा पारधी, माजी उपसरपंच प्रकाश महाले, ग्रामपंचायतीचे प्रशासक चव्हाण, ग्रामसेविका एच. एन. दातीर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तबाजी सुपे, शिक्षक शेळके, हभप.मारुती महाले, प्रा. डॉ. भरत शेणकर, प्रा. डॉ. रेखा कढणे, प्रा. डॉ. दीपमाला तांबे, प्रा. डॉ. लक्ष्मण वाळे, प्रा. डॉ. दत्तात्रय गंधारे, प्रा. तानाजी सावंत, प्रा. जगन्नाथ आरोटे, प्रा. अनिल आवारी, उत्तम पवार, आकाश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन पवार यांनी केले. शिबिराचे अहवाल वाचन प्रा. संतोष अस्वले यांनी तर शिबिरातील उपक्रमांचे पारितोषिक वाचन प्रा. डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. नितीन लहामगे यांनी केले.
