आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणावरच डल्ला! जेवणात केवळ वरण-भात तर भाजीपाला सडलेला; कोहणे आश्रमशाळेतील प्रकार


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागातील कोहणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांना जेवणात भाजी-चपातीऐवजी केवळ वरण-भातच होता, तर भात कच्चा तर वरणात दाळच नव्हती. आमदार डॉ. किरण लहामटे, प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवर यांच्यासह इतर विभागाच्या अधिकार्‍यांना हे विदारक चित्र दिसल्याने त्यांनी संताप व्यक्त करत आमदार लहामटे यांनी प्रकल्प अधिकारी भवर यांना संबंधितांवर तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

अकोले तालुक्यात अतिवृष्टीने आदिवासी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. किरण लहामटे हे गेल्या आठवडाभरापासून नुकसानग्रस्त भागांना भेटी देवून संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना मदतीच्या सूचना करत आहे. शुक्रवारी (ता.29) देखील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पाडाळणे, अंभोळ, पैठण, शिळवंडी, गंभीरवाडी, सोमलवाडी, कोहणे, विहीर, तळे, कोथळे या गावांना भेटी देत पाहणी केली. यावेळी प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवर, नायब तहसीलदार गणेश माळवे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी सोबत होते.

या पाहणी दौर्‍यात कोहणे येथील शासकीय आश्रमशाळेत अतिशय विदारक चित्र दिसून आले. लाखो रुपये शासन विद्यार्थ्यांवर खर्च करत असतानाही विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार व सोयी-सुविधा मिळत नसल्याचे वास्तव चित्र दिसले. येथील विद्यार्थ्यांना जेवणात भाजी-चपती ऐवजी केवळ वरण-भातच दिला, त्यातही भात कच्चा तर वरणात दाळच नाही. याचवेळी भाजीपाल्याची तपासणी केली असता खराब फ्लॉवर, टोमॅटोल बुरशी आलेली तर शेवग्याच्या शेंगांमधून पाणी गळत असल्याचे दिसले. यामुळे आमदारांनी संताप व्यक्त करत प्रकल्प अधिकार्‍यांसह संबंधितांना धारेवर धरले. तत्काळ याची चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रकल्प अधिकारी भवर यांना दिले.

आदिवासी तालुका म्हणून अकोलेची ओळख आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक आदिवासी शाळा आहेत. शासन विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार, सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र तरी देखील विद्यार्थी त्यापासून वंचित राहत आहे. एकीकडे शैक्षणिक सुविधांची वाणवा तर दुसरीकडे भौतिक सुविधांचा अभाव असल्याचे दिसत आहे. याबाबत आमदार डॉ. किरण लहामटे हे आदिवासी राजूर प्रकल्प समितीचे अध्यक्ष असून त्यांनीच यात लक्ष घालून संबंधितांना वठणीवर आणण्याची गरज आहे.

या धक्कादायक प्रकाराबाबत प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित अधीक्षकांवर कडक कारवाई करणार असून, त्यास नोटीस देखील बजावणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *