डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाचे रस्ते करण्याचा प्रयत्न : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
तालुक्यातील सर्वच रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सध्याच्या घडीला डांबरी करणाऐवजी काँक्रीटीकरण करण्याचा पर्याय राज्यशासनासमोर आहे. त्यामुळे आगामी काळात संगमनेर तालुक्यातील रस्ते कायमस्वरूपी टिकाऊ राहण्यासाठी काँक्रीटीकरण रस्ते करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती आ. अमोल खताळ यांनी दिली.

तालुक्यातील वरझडी बुद्रुक येथे कांदळकर यांच्या वस्तीवर शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आ. खताळ बोलत होते. यावेळी रामदास दिघे, उत्तम दिघे, निलेश दिघे, एकनाथ कांदळकर, विनय कांदळकर, कुंडलिक कांदळकर, दामू राऊत, नवनाथ राऊत, अरुण कांदळकर, गोविंद कांदळकर, मेजर मारुती बोडखे, योगेश बोडखे, अनिल कांदळकर, कृष्णा कांदळकर, सोपान कांदळकर, कैलास कांदळकर, पंडित वेताळ, निलेश राऊत, धनगरवाडा, बोडखेवाडी, कदम वस्ती, नवामळा परिसरातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.खताळ म्हणाले, या तालुक्यातील मायबाप जनतेने मला या तालुक्याचे लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. निवडून आल्यानंतर गेले आठ ते नऊ महिन्यापासून सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन त्यांचे आरोग्य, पाणी, वीज, रस्ते यासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्यातील काही वाड्या वस्त्यांवर स्वातंत्र्यानंतरही अजून वीज पोहोचली नव्हती, मात्र आपण प्रत्येक वाडीवस्तीवर पोहोचून जेवढे शक्य आहे तेवढे कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या परिसरातील रस्त्याची कामे मंजूर आहेत परंतु ठेकेदार करत नाही असे जर तुम्ही म्हणत असाल तर तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याबाबतच्या सूचना देतो. जर त्यात ठेकेदार दोषी असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. आपल्याला फक्त इतरांसारखे निवडणुका आल्या की मगच लोकांची कामे करायचे नाही तर कायम स्वरूपीचे टिकतील अशी कामे करायची आहेत. त्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु टप्प्या टप्प्याने आपल्याला सर्वच विकास कामे पूर्ण करायची आहे. त्यादृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे.केंद्रात आणि राज्यात आपल्या विचाराचे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये संगमनेर विधानसभा मतदार संघावर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवला होता. तसाच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकावायचा आहे. त्यासाठी सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे असाही सल्ला आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना दिला

तालुक्यात विजेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. संपूर्ण तालुक्यातून १५० विजेच्या ट्रांसफार्मरची मागणी होती परंतु त्यातील पहिल्या टप्प्यात ५० ट्रांसफार्मर मंजूर केलेल्या आहेत. त्यातून बऱ्या पैकी विजेचा प्रश्न मार्गी लागेल. इतरही तालुक्यात प्रलंबित असणारे विकासकामे आपल्याला पूर्ण करायची आहे, त्यासाठी विधानसभा निवडणुकीत जशी तुम्ही मला सर्वांनी साथ दिली अशीच साथ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही द्या असे आवाहन आ. खताळ यांनी यावेळी केले.

Visits: 265 Today: 6 Total: 1101626
