समृद्ध समाजासाठी शिक्षणाचे लोकशाहीकरण महत्त्वाचे ः प्रा. बावीस्कर सहकारमहर्षी थोरात महाविद्यालयात भुरा कादंबरीवर परिसंवाद


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षणातून खर्‍या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषेतूनच मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. समृद्ध समाजासाठी शिक्षणाचे लोकशाहीकरण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जे. एन. यू. विद्यापीठातील प्राध्यापक शरद बावीस्कर यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे होत्या. तर व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य प्रा. शिवाजी नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. तुळशीराम जाधव, हेमलता राठोड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. बावीस्कर म्हणाले, आपण ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन मोठे झालो. बोलीभाषेला आपण कायम प्राधान्य दिले. शिक्षण जीवनात परिवर्तन करून त्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचे असते. मातृभाषेतून शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. खर्‍या अर्थाने बौद्धिक क्षमतेचा विकासा मातृभाषेमुळेच होतो. पूर्वी धार्मिकतेसाठी शिक्षण घेतले जायचे. मात्र आता प्रत्येकाला बौद्धिक विकास व व्यक्त होण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणामुळे प्रश्न निर्माण होतात. प्रश्नांतून बौद्धिक चिकित्सा वाढते. बोलीभाषेच्या वाढीसाठी सकस साहित्य निर्मिती होणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असून तो का व कसा आहे हे प्रत्येकाला कळाले पाहिजे. सध्या नागरिक नव्हे तर भक्त घडवण्यासाठी शिक्षणाकडे काही लोक पाहत आहेत. साहित्य, संस्कृती, शिक्षणाचे लोकशाहीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती ठोंबरे यांनी केले तर प्रा. शिवाजी नवले यांनी आभार मानले. यावेळी शहरातील वाचनप्रेमी, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 11 Today: 1 Total: 117464

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *