संगमनेर नगरपरिषदेवर येणार पुन्हा ‘महिलाराज’!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा बार सोमवारी फुटला. या आरक्षण सोडतीत संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे संगमनेर नगर परिषदेत महिला राज येणार असून आता सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.

संगमनेर नगरपरिषदेचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी सुटणार, याकडे गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते आणि इच्छुकांचे लक्ष लागले होते. अखेर झालेल्या आरक्षण सोडतीनंतर पुरुष दावेदारांचा हिरमोड झाला असून, अनेकांनी आता आपल्या अर्धांगिनींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाषा सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सोमवारी मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची घोषणा केली. त्यामध्ये ३३ नगरपरिषदांपैकी १७ नगरपरिषदांत अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले. यात संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.हे आरक्षण खुल्या महिलांसाठी जाहीर झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू होते. अनेक संभाव्य उमेदवारांनी आपापल्या गोटातून तयारी सुरू केली होती. मात्र, खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने पुरुष दावेदारांचा हिरमोड झाला असून, अनेकांनी आपल्या पत्नींना, भगिनींना किंवा कन्यांना राजकारणात उतरवण्याची चाचपणी सुरू केली आहे. या निर्णयानंतर संगमनेर शहरात नवे राजकीय समीकरण आकार घेऊ लागले आहे. आतापर्यंत राजकारणात सक्रिय असलेल्या महिला कार्यकर्त्यांना या आरक्षणामुळे नवा वाव मिळणार असून, पक्षीय स्तरावर महिलांच्या नेतृत्वाचा एक नवा अध्याय सुरू होईल अशी चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक संस्थानींही या निर्णयाचे स्वागत केले असून, संगमनेरच्या राजकारणात महिलांच्या सहभागाची वाढती छटा आगामी निवडणुकांमध्ये ठळकपणे दिसणार आहे. त्यामुळे संगमनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुका अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

आरक्षण म्हणजे संधीचा दरवाजा, आता तो महिलांसाठी खुला झाला आहे. प्रश्न एवढाच, कोणत्या महिला कोणत्या पक्षाच्या दारातून पुढे येतात, आणि कोणत्या अपक्ष लढतात ते बघावे लागेल.संगमनेरच्या राजकारणात आता महिलांचे नेतृत्व नवा अध्याय लिहिणार आहे. हे केवळ आरक्षण नव्हे, तर महिला सशक्तीकरणाची सुरुवात आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेलं राजकारण आता महिलांच्या नेतृत्वाखाली अधिक समतोल आणि लोकाभिमुख होईल.महिलांना आता स्वतःचा आवाज, स्वतःचं नेतृत्व आणि शहर विकासात थेट सहभाग घेता येणार आहे.

Visits: 93 Today: 3 Total: 1108924
