नान्नज दुमालाच्या लोकनियुक्त सरपंचाचे पद रद्द

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील नान्नज दुमाला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच भीमराज चत्तर यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांचे सरपंचपद रद्द केले असून त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.

नान्नज दुमाला येथील माजी सरपंच बाबासाहेब कडनर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्यात लोकनियुक्त सरपंच भीमराज चत्तर व निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संगमनेर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. याप्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली. बाबासाहेब कडनर यांचा विवाद अर्ज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मंजूर केला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (ब) मधील तरतुदीनुसार मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने पंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरवत चत्तर यांचे लोकनियुक्त सरपंच रद्द केले. त्याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. लोकनियुक्त सरपंदपद रद्द झालेले चत्तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. तर विवाद अर्ज दाखल करणारे बाबासाहेब कडनर हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत.

Visits: 173 Today: 1 Total: 1788820

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *